मालवण
sindhudurg fort boat accident सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमध्ये सिंधुदुर्ग किल्ल्याजवळ मच्छिमारी करणारी बोट बुडून मंगळवारी सकाळी मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत दोन मच्छिमारांचा बुडून मृत्यू झाला, तर एका तरुणाने सुदैवाने आपला जीव वाचवला. या घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे.
या दुर्घटनेत सन्मेष परब (४९) आणि अक्षय राणे (३०) यांचा मृत्यू झाला. तर सन्मेष परब यांचा मुलगा सुयोग परब याचा सुदैवाने बचाव झाला. मृत सन्मेष परब हे मालवणमधील भाजपचे सक्रिय कार्यकर्ते होते.मिळालेल्या माहितीनुसार, सन्मेष परब हे ‘सागरिका’ या नौकेतून मासेमारी करण्यासाठी गेले होते. त्यांच्यासोबत अक्षय राणे आणि त्यांचा मुलगा सुयोग परब हे देखील होते. मंगळवारी पहाटे सिंधुदुर्ग किल्ल्याजवळील खडकाळ भागात त्यांची बोट असताना समुद्रातील मोठ्या लाटेचा तडाखा बसला. त्यानंतर बोट उलटली आणि त्यामध्ये असलेले तिन्ही जण समुद्राच्या पाण्यात फेकले गेले.
या दुर्घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली. बचावकार्यादरम्यान सुयोग परब याचा जीव वाचवण्यात यश आले; मात्र सन्मेष परब आणि अक्षय राणे यांना वाचवता आले नाही. या घटनेने मालवण परिसरावर शोककळा पसरली असून, मच्छिमारांमध्येही हळहळ व्यक्त होत आहे.