जिवती तालुक्यातील नगराळा आश्रमशाळेत 30 विद्यार्थ्यांना विषबाधा

डाळ भाजीत पाल पडल्याने खळबळ, विद्यार्थ्यांवर राजुरा उपजिल्हा रुग्णालयात उपचार सुरू

    दिनांक :01-Sep-2026
Total Views |
चंद्रपूर
students-suffer-food-poisoning जिवती तालुक्यात अमरु नाईक माध्यमिक आश्रमशाळेतील 30 विद्यार्थ्यांना जेवणातून विष बाधा झाल्याची धक्कादायक घटना मंगळवार, 1 सप्टेंबर रोजी घडली. विशेष म्हणजे, डाळ भाजी शिजत असताना त्यात जिवंत पाल पडली पण सबंधित स्वयंपाकी कर्मचार्‍यांना याची भनक लागली नाही. गडचिरोली जिल्ह्यातील आश्रमशाळेत सर्पदंशामुळे तीन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच जिवती तालुक्यातील नगराळा येथील आश्रमशाळेत हा प्रकार घडला.

poisning 
 
मिळालेल्या माहितीनुसार, जिवती तालुक्यातील नगराळा येथे अमरु नाईक माध्यमिक आश्रमशाळेमध्ये वर्ग 1 ते 10 पर्यंत विद्यार्थी शिक्षण घेत आहे. यात अंदाजे 50 च्या आसपास विद्यार्थी निवासी असल्याचे बोलले जात आहे. सकाळच्या वेळी डाळ भाजी शिजत असताना त्यात जिवंत पाल पडली. पण स्वयंपाकीला याची भनक लागली नाही. त्यानंतर 29 विद्यार्थी जेवणासाठी बसले. त्यांनी भाकर देखील खाल्ली. पण डाळ भाजी वाटप करणार्‍या मुलींना पालीचे लहानमोठे तुकडे आढळून आले व त्यानंतर जेवण करण्यास मज्जाव करण्यात आला. मात्र, तोपर्यंत विद्यार्थ्यांना उलटी, मळमळ व पोटदुखी सुरू झाली. लगेच त्यांना जिवतीमधील ग्रामीण रुग्णालयात भरती करण्यात आले. त्यानंतर त्यांना राजुरा उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. सध्या सर्वच विद्यार्थ्यांची तब्येत स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे. निवासीमधील विद्यार्थी हे कुंभेझरी, पारधी गुडा, नागलोन, नोकेवाडी, पेदा आकसापूर, नगराळा, शंकर लोधी, नागपाडा आदी गावातील आहे.
 
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी रुग्णालयात जाऊन विद्यार्थ्यांचे आणि अधीक्षकांचे बयान घेण्यास सुरुवात केली आहे. अन्नाचा नमुना तपासणीसाठी पाठवण्यात येणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेमुळे आश्रमशाळेतील जेवणाच्या गुणवत्तेवर आणि स्वच्छतेवर पुन्हा एकदा गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. पालकांमध्ये संतापाचे वातावरण आहे. गडचिरोली पाठोपाठ आता जिवती तालुक्यातही असा प्रकार घडल्याने आदिवासी आश्रमशाळांच्या कारभाराची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी होत आहे.