पांढऱ्या किडीचे संकट; उत्पादनात ५० टक्क्यांपर्यंत घट होण्याची भीती

    दिनांक :01-Sep-2026
Total Views |
शेंबाळपिंपरी
sugarcane परिसरातील ऊस पिकावर पांढऱ्या किडीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाल्याने ऊस उत्पादक शेतकरी चिंतेत सापडले आहेत. या किडीमुळे उसाची वाढ खुंटून पाने पिवळी पडत असल्याचे दिसून येत आहे. प्रादुर्भाव वेळीच नियंत्रणात आणला नाही, तर ऊस उत्पादनात ५० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता शेतकऱ्यांकडून व्यक्त केली जात आहे.
 

sugarcane crop hit by white pest in shembalpimpiri; farmers fear up to 50% production loss 
शेंबाळपिंपरी परिसराला इसापूर धरणाच्या पाण्यामुळे मोठ्या प्रमाणात सिंचनाची सुविधा उपलब्ध आहे. ऊस हे नगदी पीक असल्याने परिसरातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर उसाची लागवड करतात. त्यातच परिसरापासून सहा ते ३० किलोमीटरच्या अंतरावर दोन-तीन साखर कारखाने असल्याने ऊस उत्पादकांना बाजारपेठही सहज उपलब्ध होते. मात्र, सध्या उसावर पांढऱ्या किडीचा प्रादुर्भाव वाढल्याने शेतकऱ्यांसमोर नवे संकट उभे ठाकले आहे.
सध्या ऊस पीक उंच वाढलेले असल्याने पारंपरिक फवारणी यंत्राच्या माध्यमातून शेतात जाऊन कीटकनाशकांची फवारणी करणे कठीण बनले आहे. मजुरांकडून फवारणी केल्यास उसाचे धांडे मोडण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर कीटकनाशकांची फवारणी करताना शेतकऱ्यांच्या आरोग्यावरही विपरीत परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
पांढऱ्या किडीच्या प्रादुर्भावाबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. या किडीवर नेमकी कोणती औषधे वापरावीत आणि फवारणी कोणत्या पद्धतीने करावी, याबाबत कृषी विभागाने तातडीने मार्गदर्शन करावे, अशी मागणी शेतकऱ्यांकडून होत आहे.
ऊस उत्पादकांना दिलासा देण्यासाठी कृषी विभाग आणि परिसरातील साखर कारखान्यांच्या कृषी विभागाने संयुक्तपणे उपाययोजना कराव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. उंच वाढलेल्या उसावर प्रभावीपणे कीटकनाशकांची फवारणी करता यावी, यासाठी ड्रोन फवारणी यंत्र उपलब्ध करून द्यावे, अशी मागणीही शेतकऱ्यांनी केली आहे.
पांढऱ्या किडीचा प्रादुर्भाव वेळीच रोखला नाही, तर त्याचा थेट परिणाम ऊस उत्पादनावर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासन आणि साखर कारखाना व्यवस्थापनाने या समस्येची तातडीने दखल घेऊन शेतकऱ्यांना आवश्यक मार्गदर्शन आणि फवारणीची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी जोर धरत आहे.