रुग्णालयातील जेवणात चक्क झुरळ

मनसेचा संताप, प्रशासनाच्या कारभारावर गंभीर प्रश्न

    दिनांक :01-Sep-2026
Total Views |
ठाणे
thane kalwa hospital ठाणे महानगरपालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय पुन्हा एकदा गंभीर निष्काळजीपणाच्या आरोपांमुळे वादाच्या केंद्रस्थानी आले आहे. उपचारासाठी दाखल असलेल्या एका रुग्णाला देण्यात आलेल्या रात्रीच्या जेवणाच्या ताटात चक्क झुरळ आढळल्याचा संतापजनक प्रकार समोर आला आहे. मनसेच्या जनहित व विधी विभागाचे ठाणे शहर अध्यक्ष स्वप्नील महिंद्रकर आणि त्यांच्या पदाधिकाऱ्यांनी हा प्रकार प्रत्यक्ष उघडकीस आणला. या घटनेमुळे रुग्णालय प्रशासनाचा हलगर्जीपणा आणि कथित गलथान कारभार पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
 

thane kalwa hospital food controversy: patient finds cockroach in dinner, mns demands strict action 
२८ ऑगस्ट रोजी रात्री रुग्णालयातील वॉर्ड क्रमांक ६ मध्ये डोळ्यांच्या शस्त्रक्रियेसाठी दाखल असलेल्या एका रुग्णाला जेवणाचे ताट देण्यात आले होते. रुग्ण जेवण करत असताना अन्नामध्ये झुरळ असल्याचे निदर्शनास आले. हा प्रकार समोर आल्यानंतर वॉर्डमधील इतर रुग्णांमध्येही संतापाची लाट उसळली. घटनेची माहिती मिळताच स्वप्नील महिंद्रकर यांनी सहकाऱ्यांसह तातडीने वॉर्डमध्ये धाव घेत पाहणी केली आणि रुग्णालय प्रशासनाला या प्रकाराबाबत जाब विचारला.
कळवा रुग्णालयात ठाणे, कल्याण-डोंबिवली तसेच ग्रामीण भागातून दररोज हजारो सामान्य नागरिक उपचारासाठी येतात. रुग्णालयातील रुग्णांना दररोज सुमारे एक हजारहून अधिक जेवणाची ताटे पुरवली जातात. त्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणावर पुरवठा होणाऱ्या अन्नाच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
रुग्णांना दिल्या जाणाऱ्या जेवणाच्या निकृष्ट दर्जाबाबत यापूर्वीही वारंवार तक्रारी करण्यात आल्याचा आरोप आहे. मात्र, प्रशासनाने या तक्रारींकडे सातत्याने दुर्लक्ष केल्याचा दावा केला जात आहे. रुग्णांच्या आरोग्याशी आणि जीवाशी थेट संबंधित असलेल्या अन्नामध्ये झुरळ आढळल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. या गंभीर प्रकारावर स्वप्नील महिंद्रकर यांनी रुग्णालय प्रशासनावर जोरदार टीका केली.
“सध्या राज्यभरात अन्न व औषध प्रशासनाकडून खाद्यपदार्थांच्या सुरक्षेबाबत धडक कारवाया सुरू आहेत. असे असताना ठाण्यातील सरकारी रुग्णालयात एवढा अक्षम्य प्रकार घडूनही अन्न व औषध प्रशासन गप्प का बसले आहे?” असा सवाल महिंद्रकर यांनी उपस्थित केला. रुग्णालयातील स्वयंपाकघर, अन्न तयार करण्याची प्रक्रिया तसेच अन्नाच्या साठवणुकीची व्यवस्था अन्न सुरक्षा मानकांनुसार आहे की नाही, याची तातडीने तपासणी करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली.
रुग्णालयात उपचारासाठी येणाऱ्या नागरिकांना स्वच्छ, सुरक्षित आणि दर्जेदार अन्न मिळणे हा त्यांचा मूलभूत हक्क असल्याचे मनसेने म्हटले आहे. रुग्णांच्या जीवाशी संबंधित असलेला हा प्रकार कोणत्याही परिस्थितीत सहन केला जाणार नाही, अशी भूमिका मनसेने घेतली आहे. या प्रकरणी रुग्णालयाला जेवण पुरवणाऱ्या संबंधित ठेकेदाराला तात्काळ काळ्या यादीत टाकावे, तसेच संबंधित ठेकेदारासह जबाबदार रुग्णालय अधिकाऱ्यांवर तातडीने फौजदारी गुन्हे दाखल करावेत, अशी मागणी मनसेच्या वतीने करण्यात आली आहे.