मुंबई
tukaram mundhe महाराष्ट्रातील अन्नसुरक्षेचा मुद्दा सध्या चर्चेत असताना IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या कारवायांकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अन्न आणि औषध प्रशासनाचे (FDA) आयुक्त म्हणून जबाबदारी सांभाळताना मुंढे यांच्या नेतृत्वाखाली राज्यभरातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स आणि विविध खाद्यपदार्थ विक्रीच्या ठिकाणी तपासण्या सुरू आहेत. याच तपासणीदरम्यान समोर आलेला एक भन्नाट किस्सा तुकाराम मुंढे यांनी एका मुलाखतीत सांगितला असून, तो ऐकून अनेकांना धक्का बसला आहे.
अन्नसुरक्षा तपासणीदरम्यान आलेला अनुभव सांगताना मुंढे यांनी एका रेस्टॉरंटचा उल्लेख केला. FDAच्या अधिकाऱ्यांची टीम स्वच्छतेची पाहणी करण्यासाठी एका रेस्टॉरंटमध्ये पोहोचली असता तिथे मोठ्या प्रमाणात उंदीर फिरताना आढळले. अधिकाऱ्यांनी याबाबत रेस्टॉरंटच्या मॅनेजरला जाब विचारला आणि किचनमध्ये नेमके काय सुरू आहे, असा सवाल केला. मात्र, मॅनेजरने दिलेले उत्तर ऐकून अधिकारीही चक्रावले.
याबाबतचा किस्सा सांगताना तुकाराम मुंढे म्हणाले, “जेव्हा आमची टीम स्वच्छता तपासण्यासाठी एका रेस्टॉरंटमध्ये पोहोचली, तेव्हा तिथे सर्वत्र उंदीर धावत होते. जेव्हा अधिकाऱ्यांनी मॅनेजरला जाब विचारला आणि किचनमध्ये काय चाललंय असं विचारलं, तेव्हा मॅनेजरने कोणताही संकोच न दाखवता स्वत:चा बचाव करत सांगितलं, हे काही घाणेरडे प्राणी नाहीत, तर रेस्टॉरंटचे पाळीव उंदीर आहेत.”या घटनेचा उल्लेख करताना तुकाराम मुंढे यांनी अन्नसुरक्षेच्या नियमांबाबत कठोर भूमिका स्पष्ट केली. अन्नसुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन झाल्यास केवळ कारणे किंवा सबबी सांगून संबंधितांची सुटका होणार नाही, असा स्पष्ट संदेश त्यांनी दिला. एखादी चूक अनवधानाने झाली असेल, तर ती सुधारण्याची संधी संबंधितांना दिली जाऊ शकते. मात्र, नियमांचे उल्लंघन केल्यानंतर केवळ सबबी पुढे करून कारवाई टाळता येणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.याच कठोर भूमिकेमुळे तुकाराम मुंढे सध्या चर्चेत आहेत. त्यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र FDAकडून मोठ्या प्रमाणावर तपासण्या सुरू असून, नियमांचे उल्लंघन करणाऱ्या काही आस्थापनांवर परवाने निलंबित करण्यासारखी कारवाईही करण्यात आली आहे. २६ मे २०२६ रोजी FDA आयुक्तपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर अवघ्या दोन महिन्यांत त्यांच्या पथकाने ३,००० हून अधिक तपासण्या केल्या असून, जवळपास १६५ आस्थापनांचे परवाने निलंबित करण्यात आले आहेत.एक्सपायर्ड खाद्यपदार्थांवरील तारीख बदलण्यापासून ते अस्वच्छ स्वयंपाकघरांपर्यंत अन्नसुरक्षेशी संबंधित विविध प्रकरणांवर सध्या कारवाई केली जात आहे. महाराष्ट्र FDAच्या या कारवायांमुळे राज्यातील अन्नसुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, खाद्यपदार्थ विक्री करणाऱ्या आस्थापनांमध्ये स्वच्छता आणि नियमपालनाबाबतही चर्चा सुरू झाली आहे.