मुंबई
china exhibition चीनमधील ऐतिहासिक शिआन शहरात आयोजित करण्यात आलेल्या ‘द थर्ड बेल्ट अँड रोड एशियन स्कल्प्चर एक्झिबिशन–चायना · साऊथ एशिया · साऊथईस्ट एशिया स्कल्प्चर एक्झिबिशन’मध्ये मुंबईचे दृश्यकलावंत व शिल्पकार डॉ. नरेंद्र बोरलेपवार आणि समकालीन शिल्पकार प्रदीप जोगदंड भारताचे प्रतिनिधित्व करणार आहेत. आशियातील १२ देशांतील निवडक शिल्पकार सहभागी होणाऱ्या या आंतरराष्ट्रीय प्रदर्शनासाठी दोघांची ‘फॉरेन एक्स्पर्ट्स’ म्हणूनही विशेष निवड करण्यात आली आहे.
या प्रदर्शनात डॉ. नरेंद्र बोरलेपवार ‘रिटर्निंग टू द सॉइल – द फायनल मोमेंट’ हे ब्लॅक मार्बल आणि ब्रासपासून साकारलेले शिल्प सादर करणार आहेत. या कलाकृतीतून मानवी अस्तित्व, मातीशी असलेले नाते आणि जीवनाच्या अंतिम टप्प्याशी संबंधित तत्त्वचिंतनात्मक पैलू मांडण्यात आले आहेत.
प्रदीप जोगदंड china exhibition यांचे ‘बियॉन्ड टुगेदरनेस – द सायलेंट आर्किटेक्चर ऑफ लव्ह’ हे ब्रासमधील शिल्प या प्रदर्शनाचे आणखी एक वैशिष्ट्य ठरणार आहे. प्रेम, विश्वास, त्याग, समर्पण आणि परस्परावलंबनातून निर्माण होणाऱ्या अदृश्य नात्यांचा वेध या कलाकृतीत घेण्यात आला आहे. दोन अस्तित्वे एकमेकांना कशा प्रकारे समृद्ध करतात, हा विचार या शिल्पातून अधोरेखित करण्यात आला आहे.दोन्ही कलाकृतींमधून मानवी जीवन, नातेसंबंध आणि तत्त्वचिंतनाचे वैश्विक पैलू मांडले जाणार आहेत. आशियातील विविध देशांतील निवडक शिल्पकारांच्या सहभागामुळे या प्रदर्शनाला आंतरराष्ट्रीय महत्त्व प्राप्त झाले असून, त्यामध्ये भारताचे प्रतिनिधित्व करणाऱ्या डॉ. नरेंद्र बोरलेपवार आणि प्रदीप जोगदंड यांच्या कलाकृतींमुळे भारतीय समकालीन शिल्पकलेची आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रभावी उपस्थिती नोंदवली जाणार आहे.