पाटणा,
Update on the NEET paper leak case NEET 2024 पेपरफुटी प्रकरणात तुरुंगात असलेले संजीव मुखिया यांना मोठा दिलासा मिळाला आहे. पाटणा येथील सीबीआय विशेष न्यायालयाने या प्रकरणातील त्यांची न्यायालयीन कोठडी संपवून सुटकेचे आदेश दिले आहेत. मात्र, दुसऱ्या प्रकरणात त्यांच्यावर कारवाई सुरू असल्याने या आदेशानंतरही त्यांची तातडीने तुरुंगातून सुटका होणार नाही.संजीव मुखिया मे 2025 पासून पाटणाच्या ब्युर तुरुंगात न्यायालयीन कोठडीत होते. NEET पेपरफुटी प्रकरणात सीबीआयने त्यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केलेले नव्हते. यानंतर विशेष न्यायालयाने त्यांना नियमित जामीन मंजूर केला होता. मात्र जामीन मंजूर झाल्यानंतरही ते आवश्यक जामीनपत्र सादर करू शकले नव्हते. आता न्यायालयाने या प्रकरणातील त्यांची न्यायालयीन कोठडी समाप्त करून सुटकेचा आदेश दिला आहे.

तपासाच्या काळात सीबीआयने संजीव मुखिया यांची रिमांडवर चौकशी केली होती. मात्र NEET पेपरफुटी प्रकरणात त्यांच्या थेट सहभागाबाबत तपास यंत्रणेने आरोपपत्र दाखल केलेले नाही. या प्रकरणात सीबीआयने आतापर्यंत विशेष न्यायालयात 45 आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे.दरम्यान, NEET प्रकरणातून न्यायालयीन कोठडीतून सुटकेचा आदेश मिळालेला असला तरी संजीव मुखिया यांचा तुरुंगातील मुक्काम सध्या कायम राहणार आहे. आर्थिक गुन्हे शाखेने म्हणजेच EOU ने दाखल केलेल्या स्वतंत्र प्रकरणात त्यांच्याविरोधात चौकशी सुरू आहे. त्यामुळे या प्रकरणातील कारवाई पूर्ण होईपर्यंत त्यांना तुरुंगाबाहेर येता येणार नाही.
NEET 2024 पेपरफुटी प्रकरणाची सुरुवातीची एफआयआर पाटणातील शास्त्री नगर पोलीस ठाण्यात दाखल झाली होती. त्यानंतर आर्थिक गुन्हे शाखेने तपासाची सूत्रे हाती घेतली आणि संजीव मुखिया यांची अनेक दिवस रिमांडवर चौकशी केली. पुढे केंद्र सरकारने या प्रकरणाचा तपास सीबीआयकडे सोपवला. सीबीआयने तपास सुरू केल्यानंतर संजीव मुखिया यांची पुन्हा चौकशी करण्यात आली. आता सीबीआय विशेष न्यायालयाच्या आदेशामुळे NEET पेपरफुटी प्रकरणातील संजीव मुखिया यांची न्यायालयीन कोठडी संपली आहे. मात्र EOUच्या स्वतंत्र प्रकरणामुळे त्यांच्या प्रत्यक्ष सुटकेचा मार्ग अद्याप खुला झालेला नाही. दरम्यान, जुलै महिन्यात सर्वोच्च न्यायालयाने NEET पेपरफुटी प्रकरणात संजीव मुखिया यांना निर्दोष ठरवले होते.