पाटणा,
warning signal for fish eaters बिहारच्या अनेक भागांत पुराचे पाणी वाढत असताना नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्नही गंभीर बनला आहे. नेपाळमधून आलेल्या पुराच्या पाण्यासोबत काही भागांत अज्ञात आणि असामान्य माशांच्या प्रजाती आल्याचे वृत्त आहे. या पार्श्वभूमीवर बिहार सरकारच्या दुग्ध, मत्स्य आणि पशुधन विभागाच्या मत्स्य विभागाने नागरिकांना पुराच्या पाण्यात पकडलेले मासे खाऊ नयेत, असा सल्ला दिला आहे. ही सूचना सोमवारी, 31 ऑगस्ट 2026 रोजी जारी करण्यात आली.
पूराचे पाणी केवळ माती आणि गाळ घेऊन येत नाही, तर त्यासोबत विविध प्रकारचे दूषित घटकही वाहून येतात. पुराच्या काळात तलाव, नद्या, सरोवरे आणि जलाशयांमधील मासे पाण्याच्या प्रवाहासोबत इतर भागांत पोहोचतात. या प्रवासात त्यांचा घाणेरडे नाले, मृत प्राणी आणि इतर प्रदूषित वस्तूंशी संपर्क येऊ शकतो. त्यामुळे अशा माशांच्या शरीरात जिवाणू, विषाणू आणि बुरशीजन्य घटक पोहोचण्याची शक्यता असते. याच कारणामुळे पुराच्या पाण्यातून पकडलेला मासा दिसायला सामान्य असला तरी तो खाण्यास सुरक्षित असेलच असे नाही. विभागाच्या माहितीनुसार, अशा प्रकारचे मासे खाल्ल्यानंतर काही लोक आजारी पडल्याचे वृत्त आहे. त्यामुळे पूरस्थिती पूर्णपणे नियंत्रणात येईपर्यंत आणि पर्यावरणातील नैसर्गिक प्रदूषण व रोगकारक घटकांचा धोका कमी होईपर्यंत पुराच्या पाण्यात पकडलेले मासे खाणे टाळण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
सरकारने केवळ नागरिकांना मासे न खाण्याचा सल्ला दिलेला नाही, तर पुराच्या पाण्यात पकडलेल्या माशांच्या बाजारातील विक्रीवरही बंदी घातली आहे. विशेषतः अनोळखी किंवा असामान्य दिसणाऱ्या माशांपासून नागरिकांनी दूर राहावे. संबंधित विभागाकडून त्या माशाची ओळख आणि सुरक्षिततेची पुष्टी झाल्याशिवाय तो खाऊ नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे. अशा माशांचे सेवन केल्यानंतर उलट्या, जुलाब, पोटदुखी, चक्कर येणे किंवा श्वास घेण्यास त्रास यासारखी लक्षणे दिसल्यास तातडीने जवळच्या आरोग्य केंद्रात किंवा रुग्णालयात उपचार घ्यावेत. तसेच संशयास्पद मासे आढळल्यास त्याची माहिती जिल्हा मत्स्य अधिकारी किंवा स्थानिक प्रशासनाला द्यावी. पुराच्या काळात अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत सूचनांचे पालन करावे, असेही मत्स्य विभागाने नागरिकांना सांगितले आहे.