अनिल कांबळे
नागपूर
girl-dies nagpur बाथरूममध्ये ठेवलेली गरम पाण्याने भरलेली बादलीतील उकळते पाणी आठ वर्षीय मुलीच्या अंगावर सांडले. या घटनेत ती गंभीररीत्या भाजली. शरीराचा सुमारे ६६ टक्के भाग गरम पाण्यामुळे होरपळल्याने तिला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, काही दिवस मृत्यूशी झुंज दिल्यानंतर मुलीचा अखेर मृत्यू झाला. तेजस्विनी आके (८, अशोक नगर,अंबाटोली ) असे मृत मुलीचे नाव आहे.
जरिपटका पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अशोक नगरमधील अंबाटोली भागात राहणारी तेजस्विनी आके रात्रीच्या वेळी बाथरुममध्ये गेली होती. त्याच वेळी अचानक वीज गेल्यामुळे संपूर्ण परिसरात अंधार पसरला. प्रकाशाअभावी तिला बाथरूममध्ये ठेवलेली गरम पाण्याची बादली दिसली नाही. तिचा पाय बादलीला धडकला. त्यामुळे तोल जाऊन ती खाली पडली. तिच्या सोबत बादलीतील उकळते पाणी तिच्या अंगावर सांडले. उकळते पाणी तेजस्विनीच्या अंगावर सांडल्याने ती गंभीररीत्या होरपळली. अपघातानंतर तिचा किंचाळण्याचा आवाज ऐकून कुटुंबीयांनी धाव घेतली. तिची गंभीर प्रकृती पाहून तिला मेडिकल रुग्णालयात नेण्यात आले. उकळत्या पाण्यामुळे तिचे शरीर ६६ टक्के होरपळे होते.
मृत्यूशी झुंज ठरली अपयशी
गंभीररित्या भाजलेल्या तेजस्विनीला वाचविण्यासाठी वैद्यकीय पथकाने सर्वतोपरी प्रयत्न केले. मात्र, तेजस्विनीच्या प्रकृतीत अपेक्षित सुधारणा होऊ शकली नाही. होरपळल्याच्या तीव्रतेमुळे तिची स्थिती गंभीरच राहिली. अखेरीस, उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. या निष्पाप मुलीच्या मृत्यूची बातमी ऐकून कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. या दुर्दैवी घटनेनंतर संपूर्ण परिसरात शोककळा पसरली आहे.