वर्धा,
11 job fairs जिल्ह्यात २९ रोजी एकाच दिवशी ११ ठिकाणी पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार महाकुंभ मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात जास्तीत जास्त नामांकित कंपण्यांचा सहभाग घ्या. त्यांच्याकडील अधिकाधिक रिक्त पदे या मेळाव्यातून कशी भरता येतील, यासाठी नियोजन करा. जिल्ह्यातील युवकांसाठी हे मेळावे मोठी संधी असल्याने जास्तीत जास्त युवकांना यात सहभागी करून घ्या, असे निर्देश पालकमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित बैठकीत रोजगार महाकुंभ मेळाव्याच्या तयारीचा पालकमंत्र्यांनी आढावा घेतला, त्यावेळी त्यांनी या सूचना केल्या. यावेळी जिल्हाधिकारी वान्मथी सी., पोलिस अधीक्षक सौरभकुमार अग्रवाल, जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता, मार्गदर्शन विभागाचे सहाय्यक आयुक्त डॉ. सुधाकर झळके, जिल्हा नियोजन समिती सदस्य संजय गाते यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार महाकुंभ अंतर्गत राज्यात एकाच दिवशी ५०० पेक्षा अधिक तर जिल्ह्यात ११ रोजगार मेळावे, प्लेसमेंट ड्राइव्हचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील प्रत्येक युवकाला त्याच्या क्षमतेप्रमाणे रोजगार उपलब्ध झाला पाहिजे, ही यामागणी भूमिका आहे. त्याच भूमिकेतून जिल्ह्यात हा मेळावा पार पडावा, असेही पालकमंत्री म्हणाले. उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रता, कौशल्य आणि अनुभवाच्या आधारे त्यांना योग्य रोजगाराच्या संधी तसेच आवश्यक मार्गदर्शन मेळाव्यातून करण्यात येणार आहे. मेळाव्यात सहभागी होण्यासाठी युवक, युवतींनी गुगल लिंकद्वारे नोंदणी करणे आवश्यक आहे.
...चौकट...
येथे होईल रोजगार मेळावे
अनेकांत स्वाध्याय मंदिर, रामनगर वर्धा, कला वाणिज्य महाविद्यालय आर्वी, आर. व्ही. परणकर अभियांत्रिकी तथा तंत्रज्ञान महाविद्यालय आर्वी, लोकमान्य महाविद्यालय आष्टी, मॉडेल हायस्कुल कारंजा, हरदयाल औद्योगिक प्रशिक्षण संस्था पुलगाव, रामदासजी तडस अशासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था देवळी, रा. सु. बिडकर महाविद्यालय हिंगणघाट, लघु उद्योग भारती (श्याम बाबा ट्रेडर्स) हिंगणघाट, विद्या विकास महाविद्यालय समुद्रपूर, डॉ. आर. जी. भोयर महाविद्यालय सेलू येथे मेळावे होणार आहे.