प्रासंगिक
रुपाली कुळकर्णी-भुसारी
Perspective अमेरिकेवरील ११ सप्टेंबरचा २००१ च्या हल्ल्याला २५ वर्षे पूर्ण झाली आहेत. योगायोगाने, कालच भारताच्या राष्ट्रीय तपास यंत्रणेने दिल्लीतील आरोपींवर चार्जशीट दाखल केले. भारतीय उपखंडातील अल कायदा - अन्सार घनवत उल हिंद ही संघटना या हल्ल्यामागे आहे. त्याच अल कायदाची ही उपशाखा आहे, ज्यांनी ११ सप्टेंबर २००१ ला अमेरिकेवर मोठा आत्मघातकी हल्ला चढवला होता. या दहशतवादी संघटनेच्या उमर ऊन नबीवर आरोपपत्र दाखल केले आहे..
कुणी स्वप्नातही कल्पना केली नसेल असे चार आत्मघातकी दहशतवादी हल्ले अमेरिकेवर ११ सप्टेंबर २००१ या दिवशी
झाले होते. वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या ११० मजली असणाऱ्या दोन इमारतींवर दोन प्रवासी विमाने धडकवून दहशतवादी हल्ला केला गेला. अमेरिकन एअरलाईन्स फ्लाईट-११ (यात २० हजार गॅलन जेट इंधन होते) आणि युनायटेड एअर लाईन्स फ्लाईट-१७५ हे अनुक्रमे उत्तर आणि दक्षिणेच्या इमारतीवर दहशतवाद्यांनी धडकवले. तसेच, अमेरिकन एअर लाईन्स फ्लाईट-७७ हे लष्कराचे मुख्यालय असणाऱ्या पेंटॅगॉनच्या पश्चिम भागावर धडकवण्यात आले. एअर लाईन फ्लाईट-९३ यातील प्रवासी आणि दहशतवादी यांच्यात झटापट झाल्याने ते एका शेतात कोसळले होते. हे विमान नक्की कोणाला लक्ष्य करणार होते, त्याचा केवळ अंदाजच बांधता आला. व्हाईट हाऊस किंवा कॅपिटल बिल्डिंग हे त्यांचे लक्ष्य असावे, असे म्हटले जाते. हा हल्ला कट्टर इस्लामिक मूलतत्त्ववादी संघटना अल कैदाने केला होता; ज्यात ३००० जण बळी गेले. २००२ ला ओसामा बिन लादेनने या हल्ल्याचे समर्थन करीत जी कारणे सांगितली होती, ती आजही धोक्याचे इशारे आहेत. म्हणूनच हल्ल्याची या पंचविशी महत्त्वाची आहे.
अमेरिकेवरील ९/११ हल्ल्याच्या वेळी तालिबानचा पाठिंबा अल कैदाला आणि तालिबानच्या मुल्ला ओमरचा ओसामा बिन लादेनला होता. ‘वॉर ऑन टेररीझम’ या धोरणाला राबविले गेले. ओसामा बिन लादेन आणि अल कैदाचे जाळे नष्ट करणे हा हेतू त्यामागे होताच. अबोत्ताबाद पाकिस्तान येथे २ मे २०११ या दिवशी लादेनला ठार मारण्यात अमेरिकेला यश मिळाले; तरीही अल कैदा पूर्णपणे संपली नाही. उलट, अल कैदाला येऊन मिळणारे समर्थक वाढत गेले. वास्तविक जगात दहशतवादी संघटनांमध्ये लक्षणीय वाढ ९/११ नंतर झालेली दिसून येते आहे. जैश ए मोहम्मद, लष्कर-ए-तैबा, अल अक्सा मार्तीर ब्रिगेड, अल कैदा माघेरब, अल शबाब, तेहेरिक-ए-तालिबान, जैश-ए-आदल, इंडियन मुजाहिद्दीन, जेमाह अंशौरत तौहिद, हक्कानी नेटवर्क, बोको हराम, इसीस, हिजबुल मुजाहिदीन ह्या अनेक दहशतवादी संघटना निर्माण झाल्या. २००१ च्या नंतर कोणताही मोठा दहशतवादी हल्ला अमेरिकेवर झालेला नसला तरी भारत, फ्रान्स, स्पेन, इंग्लंड तसेच श्रीलंकेवर हल्ले झाले. सगळ्यात भयंकर असणारी संघटना म्हणजे इसीस- इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरीया.
अफगाणिस्तानात २०२१ च्या ऑगस्टपर्यंत अमेरिकेच्या बायडेन प्रशासनाने आपले सैन्य पूर्णपणे माघारी घेण्याची प्रक्रिया चालू केली. तालिबानने अनेक शहरांवर ताबा मिळवत आपली सर्वोच्च सत्ता प्रस्थापित केली आहे. त्यामुळे आता जरी अल कैदावर नियंत्रण ठेवण्याची भाषा केली जात असली, तरीही तालिबानबरोबरच अल कैदाचेसुद्धा पुनरुज्जीवन झाले आहे. पाकिस्तानच्या मदतीने १९९६ ते २००१ पर्यंत ‘शरिया कायदा’ लागू करुन इस्लामिक मूलतत्त्व तालिबानने जोपासला होता. अफगाणिस्तानातील प्रशिक्षण शिबिरांपासून सुरू झालेली दहशतवादाची पेरणी आफ्रिका, मध्यपूर्व, दक्षिण आशिया आणि युरोपपर्यंत विस्तारत गेली. तसेच, यातूनच मध्यपूर्वेतील राजकीय अस्थिरतेच्या पृष्ठभूमीवर आयएसआयएसचा झपाट्याने उदय झाला; तोच मुळात इस्लामिक कट्टरतेच्या पायावर.
भारतासाठी धडा
दहशतवादाच्या या बदलत्या स्वरूपाचा भारतावरही मोठा परिणाम झाला. दक्षिण आशिया हा अल-कायदा, तालिबान, लष्कर-ए-तय्यबा, जैश-ए-मोहम्मद आणि नंतर आयएसआयएससारख्या विविध दहशतवादी संघटनांच्या हालचालींच्या दृष्टीने संवेदनशील प्रदेश राहिला आहे. भारतासाठी आव्हान केवळ सीमापार दहशतवादाचे नाही. त्याचे स्वरूप व्यापक आहे. इंटरनेट, सोशल मीडिया, ऑनलाईन प्रचार, कट्टरतावादी विचारसरणी आणि स्थानिक पातळीवरील भरती यांमुळे दहशतवादाचे स्वरूप अधिक गुंतागुंतीचे झाले आहे. इस्लामिक दहशतवादी संघटना आता आशियायी देशांमध्ये हल्ले चढवत आहेत. त्यांचे लक्ष्य आता दक्षिण आशिया क्षेत्राकडेही आहे. लांब असणाऱ्या इराक-सिरियातील घडामोडींचा प्रभाव थेट आपल्या देशावरही पडतो ही दाहक वस्तुस्थिती आहे. भारतातील अनेक जण इसीसला जाऊन मिळाले. काही जणांना परत आणण्यात यश मिळाले. तसेच भारतात कलम ३७० रद्द करणे, राम मंदिराचे भूमिपूजन, नागरिकत्त्व दुरुस्ती कायदा हे जरी देशांतर्गत निर्णय असले तरीही काही गट असंतुष्ट आहेत. तालिबानने पुन्हा अफगाणिस्तानमध्ये सत्ता मिळवली आहे. दिल्लीत घडवून आणला गेलेला आत्मघातकी दहशतवादी हल्ला अल कायदाच्या विचारांनी प्रेरित झालेला होता. याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही.
अनुत्तरित प्रश्न : वास्तविक ९/११ नंतर जग हादरले आहे. त्यामुळे दहशतवादाचे दाहक रूप समोर आले. जगात सुरक्षा व्यवस्था वाढविली आहे. विमानतळांवरील तपासणी कडक केली. गुप्तचर यंत्रणांमध्ये आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढवले तसेच दहशतवाद्यांच्या आर्थिक स्रोतांवर नियंत्रण आणण्याचा प्रयत्न केला आहे. दहशतवादाने आपले रूप बदलले आहे. मूळ प्रश्न आहे तो जहाल विचारसारणीला हरवण्याचा. इस्लामी दहशतवाद्यांना सगळे जग इस्लाममध्ये धर्मांतरित करायचे आहे. हेच आपल्यापुढील आव्हान आहे.
९९२२४२७५९६