इस्लामाबाद,
52 Pakistani soldiers killed पाकिस्तानी लष्करी तळ आणि मोहीमेसाठी जाणाऱ्या वाहनांवर केलेल्या हल्ल्यात ५२ सैनिकांना मारण्यात आल्याची माहिती बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने (बीएलए) निवेदनात म्हटले आहे. ही कारवाई १ ते ७ सप्टेंबर या काळात करण्यात आली. बलुचिस्तान प्रांतात घुसखोरी करून नागरिकांवर अत्याचार करणाऱ्या पाकिस्तानी लष्करावर आमची कारवाई यापुढे देखील सुरूच राहणार आहे.बीएलएने दिलेल्या माहितीनुसार, सप्टेंबरच्या पहिल्या सात दिवसांत केलेल्या २८ कारवायांमध्ये ५२ पाकिस्तानी लष्करी सैनिक ठार झाले असून, अनेक जण जखमी झाले. या कारवाईत पाकिस्तानी सुरक्षा दलांची वाहने, मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि लष्करी उपकरणे ताब्यात घेण्यात आली.

क्वेट्टामध्ये एका पाकिस्तानी लष्करी गुप्तहेराला गोळ्या घालून ठार करण्यात आले. त्यांनी निवेदनात म्हटले की, अलिकडे बलुचिस्तानमधील परिस्थितीवर मुख्यमंत्री सरफराज बुगती आणि पाकिस्तानच्या राष्ट्रीय दहशतवादविरोधी प्राधिकरणाचे प्रमुख मेजर जनरल फैसल नसीर यांच्यात बैठक झाली. या बैठकीतून असे सूचित होते की, पाकिस्तानी लष्कर बलुचिस्तानमधील आपल्या कारवाया आणखी तीव्र करण्याची तयारी करत आहे. असे झाल्यास पाकिस्तानी लष्कराला आगामी काळात मोठी किंमत चुकवावी लागेल. लष्कराविरोधात सुरू असलेल्या मोहिमेत ४८ बलुच लढवय्ये ठार झाले.
पाकिस्तानी लष्कराच्या क्रूर मोहिमेनंतरही, बलुच बंडखोर अधिक तीव्रतेने हल्ले करत आहेत. जुलैमध्ये, बलुचिस्तानमधील मांगी धरण प्रकल्पावरील एका तपासणी नाक्यावर झालेल्या हल्ल्यात बंदूकधाऱ्यांनी नऊ पोलिस अधिकाऱ्यांना ठार केले. मे महिन्याच्या सुरुवातीला, एका आत्मघाती हल्लेखोराने स्फोटकांनी भरलेली कार पाकिस्तानी सुरक्षा दल आणि त्यांच्या कुटुंबीयांना घेऊन जाणाऱ्या ट्रेनमध्ये घुसवली. या स्फोटात ३० हून अधिक लोक ठार झाले, तर ऑगस्ट महिन्यात २५ सैनिक मारले गेले.