पराग मगर
नागपूर,
ai brings a fresh spark to 80s गेल्या तीन-चार दिवसांपासून समाजमाध्यमांवर १९८० च्या दशकाची आठवण करून देणाऱ्या ‘रेट्रो पोर्ट्रेट’ छायाचित्रांचा ट्रेंड चांगलाच रंगला आहे. लांब केस, फुलाफुलांचे डिझाइन असलेले कपडे, काहीसे ढगळ पोशाख, जुन्या काळातील स्टुडिओची पार्श्वभूमी आणि फिल्म कॅमेऱ्याची रंगछटा असलेले फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. एआयच्या मदतीने तयार केलेल्या या छायाचित्रांमुळे फोटोप्रेमी आणि समाजमाध्यम वापरकर्त्यांमध्ये ‘एटीज’च्या आठवणींना उजाळा मिळत आहे.
या ट्रेंडमध्ये वापरकर्ता आपला सध्याचा फोटो एआय साधनावर अपलोड करतो. त्यानंतर विशिष्ट ‘प्रॉम्प्ट’च्या माध्यमातून व्यक्तीचा चेहरा आणि व्यक्तिमत्त्वाची वैशिष्ट्ये शक्य तितकी कायम ठेवत पोशाख, केशरचना, पार्श्वभूमी, प्रकाशयोजना आणि छायाचित्राची रंगछटा बदलली जाते. परिणामी फोटोला जुन्या फिल्म कॅमेऱ्याचा ग्रेन, सॉफ्ट फोकस, फिकट रंग आणि उबदार प्रकाशयोजनेचा लूक मिळतो. भारतीय वापरकर्त्यांमध्ये विशेषतः ८०च्या दशकातील हिंदी चित्रपटांच्या नायक-नायिकांच्या शैलीची झलक देण्याचा कल दिसून येत आहे.
चॅटजीपीटी, जेमिनीकडून मदत
या ट्रेंडच्या प्रसारात चॅटजीपीटी आणि गुगल जेमिनी यांसारख्या जनरेटिव्ह एआय साधनांचा मोठ्या प्रमाणात वापर होत आहे. फोटोसोबत मजकूरातील सूचना देऊन त्याला ८०च्या दशकातील स्टुडिओ पोर्ट्रेट, फिल्म मॅगझिनचे मुखपृष्ठ, जुन्या लग्नाच्या अल्बममधील छायाचित्र किंवा बॉलीवूड पोस्टरसारखा लूक दिला जात आहे.
प्रॉम्प्ट ठरवतो फोटोचा ‘काळ’
या ट्रेंडमध्ये केवळ फोटो अपलोड करणे पुरेसे नसून ‘प्रॉम्प्ट’ची भाषा महत्त्वाची ठरते. ‘१९८०च्या दशकातील भारतीय स्टुडिओ पोर्ट्रेट’, ‘रेट्रो बॉलीवूड फिल्म लूक’, ‘व्हिंटेज फिल्म कॅमेरा’, ‘सॉफ्ट फिल्म ग्रेन’, ‘एटीजमधील कपडे आणि केशरचना’ अशा सूचना दिल्यास एआय त्यानुसार छायाचित्राची रचना करतो. चेहरा कायम ठेवून केवळ काळ, पोशाख आणि वातावरण बदलणे, हे या ट्रेंडचे प्रमुख वैशिष्ट्य आहे.
नेते, सेलिब्रिटीही ट्रेंडमध्ये
सामान्य समाजमाध्यम वापरकर्त्यांबरोबरच सेलिब्रिटी आणि राजकीय नेत्यांचेही ८०च्या दशकातील लूक असलेले फोटो आणि व्हिडीओ समाजमाध्यमांवर चर्चेचा विषय ठरत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राहुल गांधी, पीयूष गोयल, किरेन रिजिजू, हिमंता बिस्वा सरमा यांच्यासह अनेक सार्वजनिक व्यक्तिमत्त्वांचे रेट्रो लूकमधील फोटो प्रसारित झाल्याने या ट्रेंडला आणखी प्रसिद्धी मिळाली आहे.
जुन्या आठवणी, नवे तंत्रज्ञान
८०च्या दशकातील फॅशन, संगीत, चित्रपट आणि छायाचित्रांची वैशिष्ट्यपूर्ण शैली यामुळे या ट्रेंडला ‘नॉस्टॅल्जिया’ची जोड मिळाली आहे. त्या काळाचा प्रत्यक्ष अनुभव घेतलेल्यांना जुन्या आठवणी पुन्हा जगण्याची संधी मिळत आहे, तर तरुणांना आपल्या पालकांच्या किंवा जुन्या चित्रपटांतील काळाचा अनुभव घेण्याची उत्सुकता निर्माण होत आहे.
‘फोटो एडिटिंग’पासून ‘फोटो रीइमॅजिनिंग’पर्यंत
काही वर्षांपूर्वी फोटो एडिटिंग म्हणजे रंग, प्रकाश किंवा पार्श्वभूमी बदलण्यापुरते मर्यादित होते. आता एआयच्या मदतीने एखाद्या छायाचित्रातील व्यक्तीला वेगळ्या दशकात, वेगळ्या पोशाखात आणि वेगळ्या वातावरणात पुन्हा साकारता येत आहे. त्यामुळे ‘एटीज ट्रेंड’ हा केवळ समाजमाध्यमांवरील करमणुकीचा प्रकार न राहता जनरेटिव्ह एआयच्या वाढत्या वापराचे लोकप्रिय उदाहरण ठरत आहे.