मुंबई
world hottest august जागतिक तापमानवाढीचे गांभीर्य पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. ऑगस्ट 2026 हा आतापर्यंतचा जगातील सर्वाधिक उष्ण ऑगस्ट ठरला आहे. युरोपीय संघाच्या कॉपरनिकस क्लायमेट चेंज सर्व्हिसच्या (C3S) ताज्या आकडेवारीनुसार, या महिन्यातील जागतिक सरासरी तापमान जुलै 2023मध्ये नोंदवलेल्या विक्रमी तापमानाच्या बरोबरीचे राहिले. ऑगस्टमध्ये पृथ्वीचे सरासरी तापमान पूर्व-औद्योगिक पातळीपेक्षा तब्बल 1.65 अंश सेल्सिअस अधिक होते.
या वाढत्या उष्णतेचा परिणाम युरोपमध्येही स्पष्टपणे जाणवला. जून ते ऑगस्ट 2026 हा कालावधी नोंदवलेल्या सर्वाधिक उष्ण उन्हाळ्यांपैकी एक ठरला असून, तो 2024च्या पातळीइतकाच उष्ण राहिला. संपूर्ण युरोपचा विचार करता 2026चा उन्हाळा आतापर्यंतचा तिसरा सर्वाधिक उष्ण उन्हाळा ठरला, तर पश्चिम युरोपमध्ये यंदाचा उन्हाळा आतापर्यंतचा सर्वाधिक उष्ण ठरला आहे.ऑगस्टमध्ये युरोपच्या मोठ्या भागात पावसाचे प्रमाण कमी राहिले. परिणामी जमिनीतील ओलावा घटला आणि अनेक नद्यांच्या पाणीपातळीतही घट झाली. फ्रान्स, ब्रिटन, हंगेरी, रोमानिया आणि सर्बिया या देशांना गंभीर दुष्काळाचा सामना करावा लागला. राइन, डॅन्यूब, सदर्न बग आणि ड्निपर यांसारख्या प्रमुख नद्यांमधील पाण्याचा प्रवाह सामान्य पातळीपेक्षा लक्षणीय कमी राहिला.
कोरडे हवामान
युरोपातील अनेक भागांमध्ये दीर्घकाळ उष्ण आणि कोरडे हवामान कायम राहिले. ऑगस्टच्या अखेरीस काही ठिकाणी पाऊस झाल्याने दुष्काळाच्या परिस्थितीत काही प्रमाणात दिलासा मिळाला. मात्र, काही भागांमध्ये अतिवृष्टी झाल्याने पूरस्थिती निर्माण झाली. त्यामुळे एकाच काळात युरोपातील वेगवेगळ्या भागांना दुष्काळ आणि पुराचा सामना करावा लागल्याचे चित्र दिसून आले.दरम्यान, ऑगस्टमध्ये ध्रुवीय प्रदेश वगळता जगातील महासागरांच्या सरासरी समुद्रपृष्ठीय तापमानानेही विक्रमी पातळी गाठली. एक्स्ट्रा-पोलर महासागराचे सरासरी सी सरफेस टेम्परेचर (SST) मार्च 2024मध्ये नोंदवलेल्या विक्रमाच्या बरोबरीचे होते. याच काळात एक्स्ट्रा-पोलर महासागराचे दररोजचे सर्वाधिक SST 21.11 अंश सेल्सिअस नोंदवले गेले.उष्णतेचा प्रभाव उष्णकटिबंधीय प्रशांत महासागरातही दिसून आला. या भागातील समुद्राच्या पृष्ठभागाचे तापमान लक्षणीय वाढले असून, येथे अल निनोची स्थिती सातत्याने मजबूत होत असल्याचे आकडेवारीतून दिसते. जागतिक तापमानवाढीसोबत समुद्राच्या तापमानात होणारी वाढ आगामी काळात जगभरातील हवामानाच्या स्वरूपावर परिणाम करू शकते.
आर्क्टिक प्रदेशातील समुद्री बर्फाची स्थितीही चिंताजनक राहिली. ऑगस्टमध्ये आर्क्टिक समुद्री बर्फाचा सरासरी विस्तार नोंदीनुसार 12वा सर्वांत कमी होता. म्हणजेच या भागातील समुद्री बर्फाचे क्षेत्रफळ नेहमीच्या तुलनेत मोठ्या प्रमाणात कमी राहिले.दरम्यान, उष्णता आणि कोरड्या हवामानाचा परिणाम इंडोनेशियातील जंगलांवरील हंगामी आगीवरही होत आहे. ऑगस्टमध्ये तेथील हवामान जंगलांमध्ये हंगामी आगीचे प्रमाण वाढण्यास अनुकूल राहिले.कॉपरनिकसच्या आकडेवारीतून जागतिक तापमानवाढीचे परिणाम आता जगाच्या विविध भागांत प्रत्यक्षपणे जाणवू लागल्याचे स्पष्ट होत आहे. तज्ज्ञांच्या मते, जीवाश्म इंधनांचा वापर कमी करणे, स्वच्छ ऊर्जेला प्रोत्साहन देणे आणि बदलत्या हवामानामुळे निर्माण होणाऱ्या परिणामांना सामोरे जाण्यासाठी प्रभावी तयारी करणे ही काळाची गरज आहे.