नवी दिल्ली,
August 2026: The hottest month जागतिक स्तरावर ऑगस्ट २०२६ हा जुलै २०२३ च्या बरोबरीने आतापर्यंतचा सर्वाधिक उष्ण महिना ठरला. ज्यामुळे पृथ्वी किती वेगाने उष्ण होत आहे, हे पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे. हा केवळ आतापर्यंतचा सर्वात उष्ण ऑगस्टच नव्हे, तर नोंद झालेला सर्वात उष्ण महिनाही होता. यात जागतिक तापमान पूर्व-औद्योगिक पातळीच्या तुलनेत १.६५ अंश सेल्सिअसने अधिक होते. युरोपियन युनियनच्या ‘कोपरनिकस क्लायमेट चेंज सर्व्हिस’नुसार, ऑगस्ट २०२६ मध्ये जगाचे सरासरी पृष्ठभागावरील हवेचे तापमान १६.९६ अंश सेल्सिअसपर्यंत पोहोचले होते. अधिक चिंताजनक बाब म्हणजे, १८५०-१९०० या पूर्व-औद्योगिक काळातील अंदाजित सरासरी तापमानापेक्षा ऑगस्ट महिन्याचे तापमान १.६५ अंश सेल्सिअसने अधिक होते. नोव्हेंबर २०२५ नंतरचा हा असा पहिलाच महिना होता, ज्यामध्ये जागतिक सरासरी तापमान त्या मानकापेक्षा १.५ अंश सेल्सिअसने अधिक वाढले. १६.९६ अंश सेल्सिअस ही जागतिक सरासरी ऑगस्ट महिन्यासाठीच्या १९९१-२०२० च्या सरासरीपेक्षा ०.८५ अंश सेल्सिअसने अधिक होती, ज्यामुळे ‘कोपरनिकस’च्या नोंदीनुसार हा ऑगस्ट सर्वात उष्ण ठरला. उष्णतेचा प्रभाव केवळ जमिनीपुरताच मर्यादित नव्हता.

ऑगस्ट महिन्यात, ध्रुवीय प्रदेशांशिवाय जगातील महासागरांच्या पृष्ठभागाचे सरासरी तापमान २१.०७ अंश सेल्सिअस इतके नोंदवले गेले. या महिन्यासाठीची ही आतापर्यंतची सर्वोच्च नोंद आहे. तसेच, कोणत्याही महिन्यासाठीची ही सर्वोच्च सरासरी तापमान नोंद मार्च २०२४ मध्येही दिसून आली होती. ज्याची बरोबरी या आकडेवारीने केली आहे. जून ते ऑगस्ट हा कालावधी जागतिक स्तरावर नोंदीनुसार संयुक्तपणे सर्वाधिक उष्ण तीन महिन्यांचा कालावधी ठरला असून, त्याने २०२४ ची बरोबरी केली आहे. पश्चिम युरोपमध्ये हा उन्हाळा आतापर्यंतचा सर्वाधिक उष्ण ठरला. या काळात प्रदेशाचे सरासरी तापमान २१.६९ अंश सेल्सिअस नोंदवले गेले. ते १९९१-२०२० च्या सरासरीपेक्षा २.५४ अंश सेल्सिअसने अधिक होते. जागतिक हवामान नोंदींच्या दृष्टीने ऑगस्ट २०२६ हा एक उल्लेखनीय महिना ठरला.
उष्णतेची तीव्रता वाढली
या आकडेवारीचे दृश्य परिणामांमध्येही रूपांतर झाले. युरोपमध्ये वारंवार उष्णतेच्या लाटा, नद्यांमधील पाण्याचा कमी प्रवाह आणि वणव्यांच्या घटना पाहायला मिळाल्या. फ्रान्स, युनायटेड किंगडम, हंगेरी, रोमानिया आणि सर्बिया यांसारख्या देशांमध्ये तीव्र दुष्काळ पडला होता. नेपाळ आणि चीनच्या तिबेटमध्ये आलेले जीवघेणे पूर व दरडी कोसळण्याच्या घटनांची भर पडली, तर आशिया आणि युरोपच्या काही भागांत वणव्यांचे प्रमाण वाढले.