दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना हेक्टरी ५० हजारांची मदत द्या : रोहित पवार

    दिनांक :10-Sep-2026
Total Views |
नागपूर,
drought-relief-projectमहाराष्ट्रासह विदर्भात पावसाचे प्रमाण मोठ्या प्रमाणात घटले असून खरीप हंगाम अडचणीत आला आहे. आगामी रब्बी हंगामावरही त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्य सरकारने तत्काळ दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना प्रतिहेक्टरी ५० हजार रुपये मदत द्यावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी केली.
शरद पवार यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्रातील विविध भागांचा दौरा करून परिस्थितीचा आढावा घेतला जात असल्याचे पवार यांनी सांगितले. विदर्भातील पदाधिकाऱ्यांची विभागीय आयुक्तांसोबत बैठक झाली असून, दुष्काळ जाहीर करण्यासोबतच शेतीवर अवलंबून असलेल्या मजुरांना मदत, शेतकऱ्यांच्या मुलांना शैक्षणिक मदत, पशुधनासाठी आर्थिक मदत आणि पिण्याच्या पाण्यासाठी टँकर उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे.
 
pawar
कर्जमाफीच्या मुद्द्यावरही पवार यांनी सरकारला घेरले. कर्जमाफीची योजना ३५ हजार कोटी रुपयांची असून सरकारकडून आतापर्यंत १० हजार कोटी रुपये देण्यात आले आहेत. मात्र, ४३ लाख शेतकरी अद्याप वंचित असल्याचा दावा त्यांनी केला. येत्या १५ ते २० दिवसांत कर्जमाफीची अंमलबजावणी करावी, अशी मागणी त्यांनी केली. अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना अद्याप मदत मिळाली नसल्याचे सांगत रोजगार हमी योजनेची व्याप्ती वाढविण्याची मागणीही त्यांनी केली.
धान उत्पादकांना ३५ रुपये दर द्या
धान उत्पादक शेतकऱ्यांना बोनस देण्याचे आश्वासन सरकारने दिले होते; मात्र दोन वर्षे उलटूनही बोनस मिळालेला नाही, असा आरोप पवार यांनी केला. छत्तीसगडमध्ये ३५ रुपये दराने धान खरेदी होत असल्याचे सांगत महाराष्ट्रातही शेतकऱ्यांना ३५ रुपये दर मिळावा, अशी मागणी त्यांनी केली.
मानव-वन्यजीव संघर्षावर धोरणाची गरज
वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांमध्ये शेतकरी आणि नागरिकांना मदत मिळण्यासाठी सरकारने स्पष्ट आणि शेतकरीहिताचे धोरण आणावे, अशी मागणी पवार यांनी केली. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यानंतर मदतीसाठी अनेक अटी लावल्या जात असल्याने पीडितांना अडचणी येत असल्याचे त्यांनी सांगितले.
MPSC परीक्षेच्या निर्णयावरही टीका
MPSC परीक्षा पुढे ढकलण्याच्या निर्णयाचे स्वागत करतानाच पवार यांनी पेपरफुटीच्या प्रकरणावर प्रश्न उपस्थित केले. FDA पेपरफुटीमध्ये सहभागी असलेल्या व्यक्तींचा अन्य परीक्षांमध्येही सहभाग असल्याचा संशय असल्याचे त्यांनी सांगितले. विद्यार्थ्यांचा MPSCवरील विश्वास कायम राहण्यासाठी संपूर्ण यंत्रणेत बदल करण्याची गरज असल्याचे ते म्हणाले. आज दुपारी पत्रकार परिषद घेऊन या संदर्भातील आणखी काही मुद्दे मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले.
विरोधी पक्षांनीही विविध आंदोलनांमध्ये एकत्र येऊन सामान्य जनतेच्या प्रश्नांना ताकद देण्याची गरज असल्याचे पवार यांनी सांगितले. नेत्यांनी केवळ निवेदने न देता प्रत्यक्ष आंदोलनस्थळी उपस्थित राहणे आवश्यक असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.