नवी दिल्ली,
India focuses on research opportunities. भारताकडे असलेल्या कमी खर्चातील संशोधनाच्या संधीचा योग्य वापर केल्यास देश संशोधन आणि विकास क्षेत्रात तब्बल १२ लाख कोटी रुपयांची मोठी झेप घेऊ शकतो. यासाठी सरकारी पाठबळ, औद्योगिक गुंतवणूक आणि नामांकित शैक्षणिक संस्थांची ताकद एकत्र आणणे अत्यंत आवश्यक असल्याचे केंद्रीय वाणिज्य व उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी म्हटले आहे.

सरकारने सुमारे एक लाख कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसाठी उपक्रम हाती घेतला आणि उद्योग जगतानेही त्यात तेवढाच वाटा उचलला, तर भारत आपल्या क्षमतांच्या जोरावर १० ते १२ लाख कोटी रुपयांपर्यंतचे संशोधन साध्य करू शकतो असे गोयल यांनी एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले आहे. यासाठी देशातील वैद्यकीय महाविद्यालये, आयआयटी आणि इतर उत्कृष्टता केंद्रांचे जाळे अत्यंत प्रभावी ठरेल. प्रॉडक्ट डिझाईन, क्लिनिकल ट्रायल्स आणि आधुनिक वैद्यकीय उपकरणांच्या निर्मितीमध्ये देशाला आघाडी घेण्याची मोठी संधी आहे. आरोग्य आणि औषधनिर्माण क्षेत्राने जेनेरिक औषधींच्या यशावर अवलंबून न राहता ‘इनोव्हेशन’ आणि नवसंशोधनावर भर देणे गरजेचे आहे. जागतिक पुरवठा साखळीशी जोडले जाऊन भारताने एक विश्वासार्ह आरोग्य भागीदार म्हणून आपली ओळख अधिक भक्कम करावी, असेही त्यांनी अधोरेखित केले.