हॉकीच्या मैदानात भारताचा जलवा

    दिनांक :10-Sep-2026
Total Views |
बीजिंग,
india shines on the hockey field चीनमध्ये सुरू असलेल्या ज्युनियर हॉकी आशिया कप २०२६ स्पर्धेत भारतीय ज्युनियर महिला हॉकी संघाने पाकिस्तानविरुद्ध एकतर्फी वर्चस्व गाजवत १९-० असा दणदणीत विजय मिळवला. या शानदार कामगिरीच्या जोरावर भारताने स्पर्धेच्या उपांत्य फेरीत प्रवेश निश्चित केला आहे. या सामन्यात भारताच्या तब्बल १३ खेळाडूंनी गोल करत पाकिस्तानला पूर्णपणे निष्प्रभ केले. पूजा मलिकने सर्वाधिक तीन गोल नोंदवले.

india shines on the hockey field 
 
सामन्याच्या सुरुवातीपासूनच भारतीय संघाने आक्रमक खेळ करत पाकिस्तानवर दबाव कायम ठेवला. सातव्या मिनिटाला पूजा साहूने भारताचे खाते उघडले आणि त्यानंतर गोलची मालिका सुरू झाली. मध्यंतरापर्यंत भारताने तब्बल १० गोल करत सामन्यावर पूर्ण पकड मिळवली होती. उर्वरित दोन क्वार्टर्समध्ये भारतीय खेळाडूंनी आणखी नऊ गोल केले. पाकिस्तानला संपूर्ण सामन्यात एकही गोल करता आला नाही. भारताकडून पूजा मलिकने तीन, तर रोशनी, सानिका, मधू आणि सुप्रिया यांनी प्रत्येकी दोन गोल केले.
 
गतविजेता भारतीय संघ आता सलग तिसऱ्या विजेतेपदासाठी सज्ज झाला आहे. भारताने यापूर्वी २०२३ आणि २०२४ मध्ये महिला ज्युनियर आशिया कपचे विजेतेपद पटकावले आहे. यंदाच्या स्पर्धेतील गटसाखळीत भारताने जपान, मलेशिया आणि दक्षिण कोरियाचा पराभव करत आपली विजयी घोडदौड कायम ठेवली आहे. आता १२ सप्टेंबर रोजी होणाऱ्या उपांत्य फेरीत भारताचा सामना दक्षिण कोरिया किंवा मलेशिया यापैकी एका संघाशी होणार आहे.