कोलंबो,
indian-prisoner-killed-sri-lankaश्रीलंकेच्या पश्चिम किनारपट्टीवरील नेगोम्बो शहरातील तुरुंगात जुलै महिन्यात झालेल्या एका दंगलीत ठार झालेल्या एका भारतीय नागरिकावर विशेष पोलिस संरक्षणात अन्त्यसंस्कार करण्यात आला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
एका कैद्याचा दफनविधी २ सप्टेंबर रोजी न्यायालयाच्या आदेशानुसार आणि सरकारी खर्चाने पार पडला, असे गुन्हे अन्वेषण विभागाने मंगळवारी नेगोम्बो दंडाधिकारी न्यायालयाला सांगितले. कोलंबोमधील भारतीय उच्चायुक्तालयाचे अधिकारी या दफनविधीच्या वेळी उपस्थित होते. मृत व्यक्तीचे नाव उन्नीकृष्णन एस. असे होते.
ते मूळचे केरळचे होते, परंतु मागील चार दशकांहून अधिक काळापासून आपल्या कुटुंबासह चेन्नईमध्ये राहत होते. ते २ मार्च रोजी श्रीलंकेत आले होते आणि गांजा बाळगल्याच्या आरोपावरून त्यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना नेगोम्बो तुरुंगात ठेवण्यात आले होते, जिथे ५ आणि ६ जुलै रोजी कैद्यांमध्ये उसळलेल्या हिंसाचारात त्यांचा मृत्यू झाला. या दंगलीत २२ कैदी आणि १० तुरुंग अधिकारी मारले गेले होते, तर सुमारे १०० जण जखमी झाले होते.
मंगळवारी पाच संशयितांची ओळख परेड घेण्यात आली, तर आणखी ११ संशयितांची ओळख परेड होणार आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. या हिंसाचाराच्या संदर्भात एकूण ८१ संशयितांवर खटला चालवला जाण्याची शक्यता आहे, असे त्यांनी सांगितले.