कोल्हापूर
madhuri elephant नांदणी मठातील माधुरी हत्तीणीच्या घरवापसीचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता निर्माण झालेली असतानाच आता या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे. माधुरी हत्तीणीबाबत उच्चस्तरीय समितीसमोरील सुनावणी पूर्ण झाली असून, अंतिम सुनावणीत नांदणी मठात तिच्यासाठी नव्याने तयार करण्यात आलेल्या सुविधांची सविस्तर माहितीही समितीसमोर मांडण्यात आली. सुनावणी पूर्ण झाल्यानंतर उच्चस्तरीय समितीने आपला निर्णय राखून ठेवला आहे. मात्र, माधुरीला पुन्हा नांदणी मठात आणण्याच्या हालचाली सुरू असतानाच प्राणी हक्कांसाठी काम करणाऱ्या पेटाने राज्य सरकारला पत्र पाठवून माधुरीला वनतारामध्येच ठेवण्याची मागणी केली आहे.
माधुरी हत्तीणीला नांदणी मठात परत आणण्याच्या प्रक्रियेला वेग येत असतानाच पेटाने राज्य सरकारला हे पत्र पाठवले आहे. त्यामुळे आता सरकार या मागणीवर काय भूमिका घेणार आणि उच्चस्तरीय समितीचा अंतिम निर्णय काय असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. माधुरीची नांदणी मठात पुन्हा घरवापसी होणार की तिला वनतारामध्येच ठेवण्यात येणार, हा प्रश्न सध्या चर्चेचा विषय ठरला आहे.
काही दिवसांपूर्वी कोल्हापूरमधील नांदणी मठात असलेल्या माधुरी हत्तीणीला गुजरातमधील वनतारा येथे हलवण्यात आले होते. नांदणी मठात माधुरीसाठी आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध नसल्याचे कारण तिच्या स्थलांतरासाठी देण्यात आले होते. मात्र, माधुरीला गुजरातमधील वनतारा येथे हलवण्यास स्थानिक नागरिकांकडून मोठ्या प्रमाणावर विरोध करण्यात आला होता. विरोध असूनही माधुरीला वनतारामध्ये दाखल करण्यात आले.
त्यानंतर माधुरीला पुन्हा नांदणी मठात आणण्यासाठी हालचाली सुरू झाल्या. याच पार्श्वभूमीवर माधुरीच्या वास्तव्याबाबत उच्चस्तरीय समितीसमोर सुनावणी झाली. अंतिम सुनावणीदरम्यान नांदणी मठात माधुरीसाठी नव्याने उभारण्यात आलेल्या सुविधांची माहिती समितीला देण्यात आली. सुनावणी पूर्ण झाल्यानंतर समितीने निकाल राखून ठेवला.मात्र, या सर्व घडामोडी सुरू असतानाच पेटाने राज्य सरकारला पत्र पाठवून माधुरीला वनतारामध्येच ठेवण्याची मागणी केली आहे. त्यामुळे माधुरीच्या घरवापसीच्या निर्णयापूर्वीच या प्रकरणात नवा पेच निर्माण झाला आहे. आता उच्चस्तरीय समितीचा निर्णय आणि त्यानंतर राज्य सरकारची भूमिका काय राहणार, याकडे कोल्हापूरसह माधुरीच्या घरवापसीची प्रतीक्षा करणाऱ्या नागरिकांचे लक्ष लागले आहे.