नागपूर,
maharashtra-crop-lossराज्यातील काही भागांमध्ये पावसाने दडी मारल्याने पिकांचे नुकसान झाले आहे. या पार्श्वभूमीवर नुकसानग्रस्त भागांचे सर्वेक्षण करण्याच्या सूचना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रशासन आणि मुख्य सचिवांना दिल्या आहेत. महसूल, कृषी आणि ग्रामविकास विभागांच्या माध्यमातून संयुक्तपणे हे सर्वेक्षण करण्यात येणार असून, सर्वेक्षणानंतर नियमाप्रमाणे आवश्यक ती नुकसानभरपाई देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे, अशी माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
अमरावती प्रकरणाची चौकशी पुढेही सुरू राहणार
अमरावतीतील घटनेप्रकरणी शासनाने दहा सदस्यीय समिती नियुक्त केली होती. समितीचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर प्राथमिक चौकशीनुसार निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. मात्र, एवढ्यावरच हे प्रकरण थांबणार नाही, असे बावनकुळे यांनी स्पष्ट केले.
भविष्यात अशा घटनांमध्ये निष्पाप जीव जाणार नाहीत, यासाठी समितीने केलेल्या शिफारशींची राज्यातील सर्व रुग्णालयांमध्ये अंमलबजावणी होणे आवश्यक आहे. लहान बाळांसाठीच्या सेंटरचे आधुनिकीकरण करण्यासाठीही शासन योजना आखत असल्याचे त्यांनी सांगितले.
हायकोर्टाच्या निरीक्षणावर पोलिसांकडून उत्तर
न्यायालयाने उपस्थित केलेल्या प्रश्नांबाबत पोलिसांकडून योग्य ते उत्तर दिले जाईल. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी करून अहवाल तयार केला असून, हायकोर्टाच्या निरीक्षणानुसार पुढील भूमिका मांडली जाईल. चौकशी निष्पक्षपणे झाली असून दोघांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. संबंधित अधिकाऱ्याला बडतर्फ करण्याबाबतही सरकार विचार करत असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.
सरकारी जमीन बेकायदेशीररीत्या कोणाच्या घशात जाणार नाही, यासाठीही शासनाने आवश्यक उपाययोजनांचा विचार केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
रोहित पवारांच्या आरोपांवर बावनकुळेंचा पलटवार
शक्तिपीठ महामार्गाच्या कामाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते रोहित पवार यांनी केलेल्या आरोपांवरही बावनकुळे यांनी प्रत्युत्तर दिले. राष्ट्रीय महामार्गाच्या कामामध्ये अनेकदा आधीपासून अस्तित्वात असलेल्या रस्त्यावर पुढील काम केले जाते. मात्र, नवीन रस्ता तयार करताना माती, मुरूम आणि इतर मूलभूत कामांपासून संपूर्ण प्रक्रिया करावी लागते. त्यामुळे कामाचा खर्च आणि अंदाजपत्रक वेगळे असते, असे त्यांनी सांगितले.
रोहित पवार यांना याची माहिती असूनही ते समाजात नकारात्मकता पसरवत असल्याचा आरोप बावनकुळे यांनी केला. शक्तिपीठ महामार्ग तयार करताना खालच्या स्तरापासून वरपर्यंत आवश्यक त्या सर्व बाबींचा विचार करून काम केले जाईल. प्रत्येक रस्त्याचे स्टँडर्ड आणि कामाचे स्वरूप वेगळे असल्याने त्याचे रेट एस्टिमेटही वेगळे असते, असे त्यांनी स्पष्ट केले.
देवेंद्र फडणवीस यांनी लोकांचा आणि शासनाचा पैसा वाया जाऊ नये यासाठी बारकाईने विचार करून अंदाजपत्रक आणि प्रेझेंटेशन तयार केले आहे. आगामी काळात भ्रष्टाचार होऊ नये आणि भ्रष्टाचाराला कोणताही वाव मिळू नये, यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे बावनकुळे यांनी सांगितले.
राजस्थानमध्ये मोठ्या विजयाचा दावा
राजस्थानमधील दहा महानगरपालिकांच्या निवडणुकीत आपण प्रभारी होतो. यावेळी राजस्थानमधील सर्व दहा महानगरपालिकांमध्ये आम्ही विजय मिळवू, असा विश्वास बावनकुळे यांनी व्यक्त केला.
नगरपंचायत आणि नगरपालिकांच्या निवडणुकांमध्ये आतापर्यंत पक्षाला अपेक्षित यश मिळाले नसले तरी त्यापेक्षा मोठा विजय १४ तारखेला पाहायला मिळेल, असा दावा त्यांनी केला.