वर्धा,
malpractices-in-the-sports-sector राज्यातील हजारो खेळाडू आर्थिक अडचणी, मर्यादित सुविधा आणि विविध अडथळ्यांवर मात करत वर्षानुवर्षे कठोर परिश्रम करून राज्य, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावर आपली गुणवत्ता सिद्ध करीत आहेत. मात्र, क्रीडा कोट्यातून शासकीय नोकरी मिळविण्यासाठी बनावट क्रीडा प्रमाणपत्रांचा वापर होत असल्याची गंभीर प्रकरणे समोर येत असल्याने प्रामाणिक खेळाडूंच्या हक्कांवरच गदा येत आहे. या पृष्ठभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली शासनाने क्रीडा प्रमाणपत्रांची पडताळणी अधिक कठोर करण्यासह क्रीडा कोट्यातील भरती प्रक्रिया पारदर्शक व काटेकोर करण्याची घेतलेली भूमिका अत्यंत महत्त्वपूर्ण असल्याचे माजी खासदार तथा महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष आणि अॅमेचर कबड्डी फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष रामदास तडस यांनी म्हटले आहे.

बनावट क्रीडा प्रमाणपत्रांशी संबंधित गैरप्रकार समोर आल्यानंतर क्रीडा क्षेत्रातील अशा प्रवृत्तींवर कठोर कारवाईची गरज निर्माण झाली आहे. गुणवंत खेळाडूंच्या मेहनतीचा गैरफायदा घेणारे दलाल, बनावट प्रमाणपत्रे तयार करणारे आणि आर्थिक गैरव्यवहार करणार्यांवर कठोरात कठोर कारवाई झाली पाहिजे. तसेच, यापूर्वी क्रीडा कोट्यातून झालेल्या भरतीतील संशयास्पद प्रमाणपत्रांचीही आवश्यकतेनुसार फेरतपासणी करण्यात यावी, अशी अपेक्षा तडस यांनी व्यत केली.
क्रीडा कोटा हा गुणवंत आणि पात्र खेळाडूंच्या हक्काचा आहे. त्यांच्या कष्टाचा सौदा करणार्यांना कोणतीही माफी असता कामा नये. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नव्या धोरणामुळे क्रीडा क्षेत्रातील गैरप्रकारांना आळा बसेल आणि प्रामाणिक खेळाडूंना त्यांच्या गुणवत्तेच्या जोरावर न्याय मिळेल, असा विश्वास रामदास तडस यांनी व्यत केला. मात्र, गैरप्रकारांविरोधातील कारवाई करताना प्रामाणिक खेळाडूंना कोणताही त्रास होणार नाही, याचीही शासनाने काळजी घ्यावी, अशी मागणीही त्यांनी केली.