छटाईच्या नावाखाली मोठ्या झाडांची कत्तल

दर्यापूर नगरपालिकेचा असाही कारभार

    दिनांक :10-Sep-2026
Total Views |
दर्यापूर
massive trees felled शहरातील विद्युत तारांवर आलेल्या तथा इमारतीला धोका असलेल्या झाडांची छटाई करण्याची परवानगी स्थानिक नगरपालिकेकडून घेत चक्क १७ मोठमोठ्या झाडांना तोडण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यामध्ये पालिकेमधीलच लोकप्रतिनिधींच्या आशीर्वादाने हे कृत्य झाल्याने दर्यापूर शहरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
 
trees
दर्यापूर शहरातील विकासकामांच्या नावाखाली झाडांची मोठ्या प्रमाणावर तोड करण्यात आल्याचा प्रकार समोर आला असून, दर्यापूर नगरपालिका प्रशासनाच्या कारभारावर नागरिकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे. दर्यापूर नगरपालिका परिसरालगत हनुमान मंदिराजवळील तब्बल १७ मोठी झाडे तोडण्यात आल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. याबाबत दर्यापूर नगरपालिकेकडून शहरातील झाडांच्या कटिंगसाठी विकासकामांशी संबंधित एका ठेकेदाराला काम देण्यात आल्याची माहिती असून, या कामाच्या आडून मोठ्या प्रमाणात झाडांची कत्तल करण्यात आली. पर्यावरणाच्या दृष्टीने महत्त्वाची असलेली जुनी व मोठी झाडे तोडण्यात आल्याने परिसरातील वृक्षप्रेमी नागरिकांमध्ये नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे.
 
विशेष म्हणजे, नगरपालिका कार्यालयाच्या अगदी जवळच्या परिसरात हा प्रकार घडला असून मुख्याधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांना याची माहिती नव्हती, की आशीर्वाद होता, हा प्रश्न निर्माण झाला आहे. झाडे तोडण्यासाठी आवश्यक परवानग्या घेण्यात आल्या होत्या का? किती झाडे तोडण्याची अधिकृत मंजुरी देण्यात आली होती? आणि प्रत्यक्षात किती झाडे तोडण्यात आली, याची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे. शहरात विकासकामे आवश्यक असली तरी विकासाच्या नावाखाली पर्यावरणाची हानी होऊ नये, अशी नागरिकांची भूमिका आहे.
 
दर्यापूर नगरपालिका क्षेत्रात जे रस्त्याच्या मध्यभागी व इलेक्ट्रिक तारांवर झाडे आहेत, त्या झाडांची छटाई करण्यासाठी परवानगी देण्यात आली, मात्र कोणतीही झाडे बुडापासून तोडण्यासाठी परवानगी देण्यात आली नाही. यावर चौकशी करून तत्काळ कारवाई करण्यात येईल .
- सुमेध खिराडे
प्रशासन अधिकारी