नवी दिल्ली,
mastermind behind Red Fort blast राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) दिल्लीच्या लाल किल्ल्याजवळ नोव्हेंबर २०२५ मध्ये झालेल्या कार बॉम्बस्फोट प्रकरणात आरोपपत्र दाखल केले. बॉम्बस्फोटात ठार झालेला उमर उन नबीच या हल्ल्याचा सूत्रधार होता, असा दावा एनआयएने केला. तपास संस्थेने त्याचे वर्णन पुनरुज्जीवित झालेल्या ‘अन्सार गझवत-उल-हिंद’ मॉड्युलचे कामकाज कथितपणे हाताळणारी व्यक्ती म्हणून केले आहे. उमर उन नबीने हा कथित दहशतवादी कट कसा रचला आणि स्फोटकांनी भरलेली गाडी लाल किल्ल्यापर्यंत कशी पोहोचली, असा प्रश्न उपस्थित हाेत आहे. उमर उन नबी उर्फ पिंडा आणि राहुल भट हे २०२२ च्या सुरुवातीपासून निष्क्रिय असलेल्या अन्सार गझवत-उल-हिंद मॉड्युलला पुन्हा सक्रिय करण्यात कथितरीत्या सामील होते. हे मॉड्युल भारतीय उपखंडात अल-कायदाच्या कथित पुनरुज्जीवनाचा एक भाग होते. नबीने लोकांना कट्टर बनवले, हौतात्म्य आणि कथित आत्मघाती हिंसाचाराला प्रोत्साहन दिले, गुप्त बैठका आयोजित केल्या आणि दहशतवादी कारवायांसाठी प्रशिक्षण व पुरवठ्याची व्यवस्था केली. आरोपपत्रात नबीच्या अफगाणिस्तानला जाण्याच्या योजनेचाही उल्लेख आहे. कट्टर बनल्यानंतर तो हिजरतच्या नावाखाली अफगाणिस्तानला जाण्याची तयारी करत होता, असे एनआयएच्या तपासात समाेर आले आहे.