सगुणा कंपनीतील ४२ मेट्रीक टन पशुखाद्याचा अपहार

चालक-वाहकास उत्तरप्रदेशातून अटक

    दिनांक :10-Sep-2026
Total Views |
५०.२० लाखांचा मुद्देमाल जप्त
 
 
वर्धा,
saguna company हिंगणघाट तालुयातील वणी येथील सगुणा कंपनीतील पशु खाद्याची खेप बिहार राज्यातील मुजफ्फर येथे ट्रेलरमध्ये भरून जाणार होती. मात्र, ट्रेलरचा चालक आणि लिनर यांनी पशु खाद्याची खेप नियोजित ठिकाणी न नेता ते खाद्य उत्तर प्रदेशात परस्पर विकून २९ लाख २८ हजार ९५ रुपयांचा अपहार केला. याप्रकरणी कंपनीचे व्यवस्थापक जनकीराम आदिविरा यांनी दिलेल्या तक्रारीवरून हिंगणघाट पोलिसांनी गुन्हा दाखल केला. तपासादरम्यान, चालक आणि लिनर दोघांनाही उत्तरप्रदेशातून अटक करून त्यांच्याकडून ५० लाख २० हजारांचा मुद्देमाल जप्त केला. चालक अंशुल वर्मा (३३) रा. अयोध्या आणि वाहक युगराजसिंह यादव (२७) रा. भवानीपूर जि. भदोही, उत्तरप्रदेश अशी आरोपींची नावे आहेत.
 
 
saguna company
 
वणी येथील सगुणा कंपनीत पशु खाद्याची निर्मिती केली जाते. हे पशु खाद्य वेगवेगळ्या राज्यात ऑर्डरनुसार विक्री केल्या जाते. कंपनीला बिहार राज्यातील मुजफ्फर येथील पशु खाद्याची ऑर्डर आल्याने कंपनीने १ ऑगस्ट रोजी २९ लाख २८ हजार ९५ रुपये किमतीचे ४१.९६० मेट्रीक टन सोया डीओसी पशु खाद्य यु. पी. ४२ डी. टी. ३६४४ क्रमांकाच्या ट्रेलरमध्ये लोड केले. या ट्रेलरवर चालक म्हणून अंशुल वर्मा तर वाहक म्हणून युगराजसिंह यादव होते. दोघांनीही पशु खाद्य घेऊन बिहारच्या दिशेने निघाले. मात्र, सदर पशुखाद्य बिहार येथील कंपनीमध्ये न पोहचविता चालक-वाहकाने सदर मालाचा अपहार करून फरार झाले. ही बाब लक्षात येताच कंपनीचे व्यवस्थापक जानकीराम आदिविरा यांनी १९ ऑगस्ट रोजी हिंगणघाट पोलिसात तक्रार नोंदविली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपासाला गती दिली. पोलिस निरीक्षक अनिल राऊत यांच्या सुचनेप्रमाणे हिंगणघाट पोलिसांचे पथक मिर्झापूर येथे पोहोचले. तांत्रिक व गुप्त माहितीच्या आधारे वाहक युगराजसिंग यादव याला शिताफीने ताब्यात घेऊन विचारपूस केली असता चालक अंशुल वर्मा याच्यासोबत मिळून पशुखाद्य कुकुटपालन व्यावसायिकांना विकल्याचे सांगितले.
 
 
दरम्यान, पोलिसांनी ट्रेलर चालक अंशुल वर्मा यालाही अटक केली. विकलेले पशुखाद्य कुकूटपालन व्यावसायिकांकडून ४ लाख ३० हजार ५६० रुपयांचे ९६ बोरी खाद्य, यु. पी. ४२ डि. टी. ३६४४ क्रमांकाचा ट्रेलर, मालाची विक्री करून मिळालेल्या पैशातून खरेदी केलेला मुद्देमाल असा ५० लाख २० हजार ५६० रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त करून दोघांनाही अटक केली. ही कारवाई पोलिस अधीक्ष सौरभकुमार अग्रवाल, अपर पोलिस अधीक्षक सदाशिव वाघमारे, उपविभागीय पोलिस अधिकारी सुशीलकुमार नायक यांच्या मार्गदर्शनात पोलिस निरीक्षक अनिल राऊत यांच्या आदेशाने पोलिस उपनिरीक्षक डी. जी. पळनोटे, गुन्हे प्रगटीकरण पथकाचे नरेंद्र डहाके, नरेंद्र आरेकर, ताबिष बेग यांनी केली.