एमपीएससी’ परीक्षा प्रकरणात चुकीचा अहवाल देणे अंगलट

पोलिस निरीक्षक राहुल शिरे यांच्या विभागीय चौकशीचे आदेश

    दिनांक :10-Sep-2026
Total Views |
अनिल कांबळे

नागपूर,
mpsc महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) परीक्षेतील गोपनीय दस्तऐवज उघड झाल्याच्या तक्रार अर्जाच्या चौकशीत हलगर्जीपणा करणे व दिशाभूल करणारा अहवाल सादर करणे नागपूर गुन्हे शाखेचे तत्कालीन पोलिस निरीक्षक राहुल शिरे यांना चांगलेच अंगलट आले आहे. या बेकायदेशीर वर्तनाबद्दल त्यांच्यावर शिस्तभंगाची तसेच विभागीय चौकशीची कारवाई सुरू करण्यात आली आहे.
 

mpsc 
मिळालेल्या माहितीनुसार, अर्जदार रवींद्र दिनकर इंगोले व इतर उमेदवारांनी दुय्यम निरीक्षक (राज्य उत्पादन शुल्क) परीक्षेतील गुणांकनाचे गोपनीय दस्तऐवज उघड झाल्याबाबत ३ जानेवारी रोजी पोलिस उपआयुक्त (गुन्हे शाखा), नागपूर शहर यांच्याकडे तक्रार अर्ज दिला होता. या अर्जाच्या चौकशीची जबाबदारी सामाजिक सुरक्षा विभागाचे तत्कालीन पोलिस निरीक्षक राहुल शिरे यांच्याकडे सोपवण्यात आली होती. पोलिस निरीक्षक राहुल शिरे यांनी ३ एप्रिल रोजी हा तक्रार अर्ज नस्तीबद्ध करण्याबाबत वरिष्ठांना अहवाल सादर केला. नवी मुंबई गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल पाटील यांच्याशी फोनवर झालेल्या चर्चेचा हवाला देत, त्यांनी एमपीएससीच्या सहसचिवांवर दोष ठेवणारी माहिती या अहवालात नमूद केली होती. मात्र, सहायक पोलिस आयुक्त (गुन्हे शाखा) यांनी केलेल्या चौकशीदरम्यान दोन्ही अधिकाऱ्यांच्या फोनवरील संभाषणाची ऑडिओ क्लिप पडताळली असता, त्यात सहसचिव, महाराष्ट्र लोकसेवा आयोग असा कोणताही उल्लेख आढळला नाही. त्यामुळे राहुल शिरे यांनी वरिष्ठांची दिशाभूल करणारी आणि खोटी माहिती अहवालात कोणत्या उद्देशाने नमूद केली, याचा ठपका ठेवत त्यांच्याविरोधात विभागीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
शिरे यांच्या हेतूची होणार चौकशी
तत्कालिन गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राहुल शिरे यांनी अहवालात आयोगाच्या सहसचिवांचा उल्लेख नेमक्या कोणत्या उद्देशाने केला?, तसेच चुकीची माहिती नमूद करून दिशाभूल का केली?, याची चौकशी करण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. अहवालातील या गंभीर त्रुटीमुळे राहुल शिरे यांच्या बेकायदेशीर वर्तनाबाबत त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्यासाठी विभागीय चौकशी सुरू करण्यात आली आहे.