मुंबई
mumbai cyber fraud सोशल मीडियावर व्हायरल होणाऱ्या आकर्षक रील्स आणि अल्प गुंतवणुकीतून मोठा नफा मिळवून देण्याच्या दाव्यांमधून सायबर भामटे नागरिकांना आपल्या जाळ्यात ओढत असल्याचे पुन्हा एकदा समोर आले आहे. वरळी परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीला पाच रुपयांच्या जुन्या नोटांच्या बदल्यात तब्बल ५१ लाख रुपये मिळतील, असे आमिष दाखवून त्याच्याकडून ३ लाख ३ हजार २३१ रुपये उकळण्यात आले. इन्स्टाग्रामवरील जाहिरात पाहिल्यानंतर आरोपींशी संपर्क साधलेल्या या व्यक्तीला विविध शुल्क आणि प्रोसेसिंग फीच्या नावाखाली वारंवार पैसे भरण्यास सांगण्यात आले. अखेर आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्याने वरळी पोलिस ठाण्यात धाव घेतली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित व्यक्तीने इन्स्टाग्रामवर एक रील पाहिली होती. पाच रुपयांच्या जुन्या नोटांच्या बदल्यात मोठी रक्कम मिळू शकते, असा दावा या जाहिरातीत करण्यात आला होता. विशेष क्रमांक असलेल्या किंवा जुन्या नोटांना मोठी किंमत मिळते, असेही त्यात नमूद करण्यात आले होते. या जाहिरातीला भुलून पीडिताने त्यामध्ये दिलेल्या व्हॉट्सॲप क्रमांकावरून संबंधित व्यक्तींशी संपर्क साधला.
संपर्क झाल्यानंतर आरोपींनी त्याच्याकडे असलेल्या पाच रुपयांच्या जुन्या नोटांचे फोटो पाठवण्यास सांगितले. त्यानुसार पीडिताने पाच जुन्या नोटांचे फोटो आरोपींना पाठवले. त्यानंतर कथित खरेदीदारांनी या नोटांच्या बदल्यात त्याला तब्बल ५१ लाख रुपये मिळू शकतात, असे सांगत त्याला मोठ्या रकमेचे आमिष दाखवले.
पीडिताचा विश्वास संपादन mumbai cyber fraud करण्यासाठी आरोपींनी सुरुवातीला त्याला एक क्यूआर कोड पाठवला आणि प्रोसेसिंग शुल्काच्या नावाखाली ११ हजार रुपये जमा करण्यास सांगितले. ही रक्कम भरल्यानंतर आरोपींनी विविध औपचारिकता आणि शुल्कांचे कारण पुढे करत त्याच्याकडे पुन्हा पुन्हा पैशांची मागणी सुरू केली. मोठ्या नफ्याचे आमिष कायम ठेवत आरोपींनी त्याच्याकडून अनेक वेळा रक्कम घेतली.
४ जून ते १२ जून २०२६ या कालावधीत आरोपींनी पीडिताला वेगवेगळ्या बँक खात्यांमध्ये पैसे हस्तांतरित करण्यास सांगितले. त्यांच्या मागणीनुसार पीडिताने एकूण ३ लाख ३ हजार २३१ रुपये जमा केले. मात्र, वारंवार पैसे भरूनही त्याला आश्वासन दिलेले ५१ लाख रुपये मिळाले नाहीत. त्यानंतर आपली फसवणूक झाल्याचे त्याच्या लक्षात आले.
या प्रकारानंतर पीडिताने वरळी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीच्या आधारे पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध माहिती तंत्रज्ञान कायद्यातील कलम ६६(सी), ६६(डी) तसेच भारतीय न्याय संहितेतील (BNS) कलम ३१८(४) आणि ३१९(२) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. आरोपींनी फसवणुकीसाठी वापरलेली बँक खाती आणि मोबाईल क्रमांक यांची माहिती पोलिसांकडून गोळा करण्यात येत असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, फेसबुक, इन्स्टाग्राम तसेच अन्य सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर जुन्या नोटा आणि नाण्यांच्या बदल्यात लाखो-कोट्यवधी रुपये मिळतील, असे दावे करणाऱ्या जाहिराती बनावट असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. अशा जाहिरातींच्या माध्यमातून सायबर भामटे नागरिकांना मोठ्या पैशांचे आमिष दाखवून संपर्कात आणतात. त्यानंतर प्रोसेसिंग फी, जीएसटी, रजिस्ट्रेशन शुल्क किंवा अन्य कारणे सांगून त्यांच्याकडून पैसे उकळले जातात. त्यामुळे सोशल मीडियावरील अशा जाहिराती आणि पैशांच्या आमिषांना बळी पडू नये, तसेच नागरिकांनी सावध राहावे, असे आवाहन पोलिसांनी केले आहे.