धारणी
murder case तालुक्यातील भुलोरी येथील युवकाच्या खून प्रकरणाचा धारणी पोलिसांनी केवळ २४ तासांत छडा लावत चार आरोपींना जेरबंद केले. आरोपी शेतशिवारात लपून बसल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचून त्यांना ताब्यात घेतले.
भुलोरीचे रहिवासी हिरालाल भय्यालाल जावरकर यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, त्यांचा मुलगा मुकेश हिरालाल जावरकर हा घराबाहेर असताना गावातील सुरेश मावस्कर याच्या पत्नीची छेडखानी केल्याच्या संशयावरून वाद झाला. त्यानंतर सुरेश मावस्कर याच्यासह सुरेश काळ्या धांडे, कुवरसिंग भिलावेकर व सुनील मावस्कर यांनी संगनमत करून मुकेशवर हल्ला केला. डोक्यासह उजव्या खांद्यावर गंभीर दुखापत करून गळा दाबून त्याचा खून केल्याची तक्रार दाखल करण्यात आली. धारणी पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.
घटनेची गंभीर दखल घेत पोलिस अधीक्षक निकेतन कदम यांनी आरोपींचा तातडीने शोध घेण्याचे आदेश दिले. त्यानुसार पोलिस निरीक्षक अवतारसिंग चव्हाण यांनी विशेष तपास पथकाची स्थापना केली. पथकाने भुलोरी येथे जाऊन आरोपींचा शोध सुरू केला. गुप्त बातमीदाराकडून आरोपी शेतात लपून बसल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी त्यांना पकडले.
सुरेश सुभाष मावस्कर, सुनील लालचंद मावस्कर, कुवरसिंग भिलावेकर आणि सुरेश काळ्या धांडे या चौघांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे पोलिसांनी सांगितले.