नायलॉन मांजावर राज्यातील सर्वात मोठी कारवाई

    दिनांक :10-Sep-2026
Total Views |
अनिल कांबळे

नागपूर,
banned nylon manja राज्य शासनाने प्रतिबंध घातलेल्या नायलॉन मांजाची अवैध विक्री आणि खरेदी नागपुरात मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. डिसेंबर महिन्यासाठी साठा करण्यात येणारा शासनाने प्रतिबंधित केलेला नायलॉन मांजा पोलिसांच्या टार्गेटवर होता. मांजा विक्रीच्या उद्देशाने वाहतूक करणाऱ्या तरुणाला सामाजिक सुरक्षा पथक आणि अमली पदार्थविरोधी पथकाने यशोधरा नगरात पकडले. त्याच्याकडून ५ लाख ४० हजार रुपये किमतीच्या मोनो काईट नायलॉन मांजाच्या १८० रिल्स, ई-रिक्षा, मोपेड आणि मोबाइल असा एकूण ७ लाख ४५ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मोहम्मद शाहिद मोहम्मद सईद अन्सारी (२७, रा. शीतला माता मंदिराजवळ, यशोधरानगर) असे कारवाईत पकडण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. या प्रकरणातील फैजान अन्सारी (रा. मोमीनपुरा) हा फरार आहे.
 

nagpur police seize rs 5.40 lakh banned nylon manja 180 reels recovered 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ९ सप्टेंबर रोजी रात्री ८.३० ते १०.१० वाजताच्या सुमारास सामाजिक सुरक्षा पथकाचे प्रमुख पोलिस निरीक्षक दर्शन पाटील यांना एकतानगर परिसरात प्रतिबंधित नायलॉन मांजाची वाहतूक होत असल्याची माहिती मिळाली. त्याआधारे पंच आणि पथकातील कर्मचाऱ्यांच्या मदतीने सापळा रचून मोहम्मद शाहिद अन्सारीला ताब्यात घेण्यात आले.
त्याच्याकडे प्रतिबंधित मोनो काईट नायलॉन मांजा आढळला. विक्रीच्या उद्देशाने बेकायदेशीररीत्या त्याची वाहतूक केली जात असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. त्यामुळे पथकाने ५ लाख ४० हजार रुपये किमतीचा मांजा तसेच वाहतुकीसाठी वापरलेली १ लाख २० हजार रुपयांची ई-रिक्षा, ७५ हजार रुपयांची सुझुकी मोपेड आणि १० हजार रुपयांचा मोबाइल असा मुद्देमालही ताब्यात घेण्यात आला. याप्रकरणी पर्यावरण संरक्षण अधिनियम १९८६ मधील कलम ५, १५ तसेच भारतीय न्याय संहितेच्या कलम २२३ अन्वये यशोधरानगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून आरोपीला पुढील तपासासाठी यशोधरानगर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले.
केला जाणार होता गोदामात साठा
डिसेंबर महिन्यांपासूनच नागपुरात नायलॉन मांजाची खरेदी-विक्री सुरु होते. मोठमोठे व्यापारी ऑगस्ट-सप्टेंबर महिन्यातच नायलॉन मांजा खरेदी करतात. तो मांजा गोदामात साठवून ठेवतात. त्यामुळे मकरसंक्रांतीच्या सणाच्या तोंडावर चढ्या दराने नायलॉन मांजा विक्री केल्या जाते. प्रतिबंधित नायलॉन मांजामुळे होणारे अपघात आणि जीवितहानी टाळण्यासाठी तसेच सर्व प्रकारच्या अवैध धंद्यावर अंकुश घालण्यासाठी पोलिसांकडून छापेमारी करण्यात येत आहे.