अनिल कांबळे
नागपूर,
nagpur traffic police अल्पवयीन मुलांकडून वाहन चालविण्याचे प्रकार रोखण्यासाठी नागपूर वाहतूक पोलिसांनी कारवाई शेवटचा पर्याय म्हणून कारवाईचा धडाका लावला आहे. गेल्या काही दिवसांत अनेक अल्पवयीन मुलांना वाहन चालविताना पोलिसांनी ताब्यात घेतले होते. या प्रकरणी न्यायालयात खटला चालविण्यात आला होता. अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्यास दिल्याप्रकरणी २६ प्रकरणांमध्ये न्यायालयाने मुलांच्या पालकांना दोषी ठरवत दोषसिद्धी केली आहे. या प्रकरणांत संबंधितांवर आर्थिक दंडासह वाहनाचे आरसी बूक एका वर्षासाठी जप्त करण्यात आले आहे.
अनेकदा अल्पवयीन मुले पालकांकडे दुचाकी किंवा कार चालविण्याचा हट्ट करतात. काही पालकही मुलांना वाहन चालविण्याची परवानगी देतात. मात्र, वाहन चालविण्यासाठी आवश्यक शारीरिक व मानसिक परिपक्वता, वाहतूक नियमांचे ज्ञान आणि वैध वाहनचालक परवाना नसलेल्या मुलाकडे वाहन सोपविणे धोकादायक ठरू शकते. अल्पवयीन चालकामुळे अपघात झाल्यास त्यात केवळ त्या मुलाचेच नव्हे, तर पादचारी, दुचाकीस्वार आणि अन्य वाहनचालकांचेही जीव धोक्यात येऊ शकतात. न्यायालयाने मोटार वाहन कायद्यातील कलम १९९ ए अंतर्गत दंडाची कारवाई केली असून, कलम १९९(४) अन्वये १२ महिन्यांसाठी वाहन चालविण्याच्या परवान्यावर रद्द किंवा अपात्रतेची कारवाई करण्यात आली आहे. प्रत्येक दोषसिद्ध प्रकरणात एकूण ३० हजार रुपयांचा दंड करण्यात आला असून, वाहनाचा परवान्यावरही १२ महिन्यांची बंदी कारवाई करण्यात आली आहे.
अशी कारणे देतात पालक
पोलिसांनी अल्पवयीन चालकांना पकडल्यानंतर पालकांना पोलिस ठाण्यात बोलविण्यात येते. ‘काही मिनिटांसाठीच वाहन देतो’, ‘मुलाला वाहन चालविता येते’ किंवा ‘जवळच जायचे आहे’, एरव्ही छान वाहन चालवतो, अद्याप त्याने कोणताही अपघात केला नाही, फक्त ड्रायव्हिंग लायसन नाही, पण गाडी चालविता येते, अशी कारणे पालक देतात. मात्र, परवाना नसताना किंवा अल्पवयीन असतानाही पालक मुलांच्या हाती वाहन देऊन स्वत:च्या मुलांसह अन्य लोकांच्या जीवांशी खेळ करीत असतात.
सामाजिक जबाबदारीचे भान
वाहतूक नियमांचे पालन करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. अल्पवयीन मुलांच्या हाती वाहन न देणे हा केवळ कायद्याचा विषय नसून, रस्त्यावरील प्रत्येक व्यक्तीच्या सुरक्षिततेशी संबंधित प्रश्न आहे. त्यामुळे पालकांनी स्वतः वाहतूक नियमांचे पालन करून मुलांसमोर आदर्श निर्माण करावा. अल्पवयीन मुलांना वाहन चालविण्यास देणाऱ्या पालक किंवा वाहनमालकांविरुद्ध यापुढेही कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा नागपूर वाहतूक विभागाने दिला आहे. पालकांनी कारवाईची भीती म्हणून नव्हे, तर आपल्या मुलांचे आणि इतरांचे जीवन सुरक्षित ठेवण्यासाठी वाहनाची चावी अल्पवयीन मुलांच्या हातात देऊ नये, असे आवाहन पोलिस उपायुक्त आदित्य मिरखेलकर यांनी केले आहे.