नागपूर,
nagpurs tanha pola शहरात पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी तान्हा पोळा साजरा करण्याची परंपरा गेल्या २३७ वर्षांपासून सुरू आहे. यंदा या परंपरेला २३७ वर्षे पूर्ण होत आहेत. भारत हा कृषिप्रधान देश असून बैलांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी देशाच्या विविध भागांत पोळा सण साजरा केला जातो. मात्र, पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी लहान मुलांकडून लाकडी बैलांचा तान्हा पोळा साजरा करण्याची परंपरा विशेषतः विदर्भात पाहायला मिळते.

सन १७८९ मध्ये दुसरे श्रीमंत राजे रघुजी महाराज भोंसले यांनी लहान बालगोपालांना बैलांचे महत्त्व समजावे, या उद्देशाने तान्हा पोळ्याची सुरुवात केल्याचे सांगितले जाते. त्यावेळी लाकडी बैल तयार करून मागविण्यात आले आणि ते लहान मुलांना वाटण्यात आले. या बैलांना जिवंत बैलांप्रमाणे सजवून आंब्याचे तोरण लावले जात असे. त्याला जिलेबी, फळे आणि सध्या चॉकलेट, बिस्कीट पुडे अशा विविध वस्तूंचे तोरण बांधले जाते. त्यामध्ये मुलांना उभे करून बैलांची पूजा करण्याची प्रथा आहे. पूजा झाल्यानंतर तोरण तोडून पोळा फोडला जातो. त्यानंतर वाजतगाजत हनुमान खिडकीचे दर्शन घेऊन हनुमानाला नारळ अर्पण केला जातो. परतल्यानंतर मुलांना खाऊ आणि पैसे वाटण्याची परंपराही आहे.
भोसले घराण्याकडून ही ऐतिहासिक परंपरा आजही जपली जात आहे. राजे मुधोजी महाराज भोंसले यांच्या सिनियर भोसला पॅलेस, महाल, नागपूर येथील निवासस्थानी सर्वात मोठा लाकडी बैल असल्याचे सांगितले जाते. या लाकडी बैलाची उंची आठ फूट, तर लांबी सहा फूट आहे. त्याच्या पायात चांदीचा तोडा घातलेला आहे. श्रीमंत राजे रघुजी महाराज भोंसले यांच्या काळापासून वाजतगाजत मिरवणूक काढण्याची परंपरा होती. त्याच परंपरेनुसार यंदाही ११ सप्टेंबर २०२६ रोजी सायंकाळी ५ वाजता मोठ्या प्रमाणात मिरवणूक काढण्यात येणार आहे. २३७ वर्षांनंतरही ही परंपरा राजे मुधोजी महाराज भोंसले यांनी नियमितपणे सुरू ठेवली असून भविष्यातही ती कायम राहील, असे मत त्यांनी व्यक्त केले आहे.
सौजन्य: देवराव प्रधान, संपर्क मित्र