हुथींच्या सौदीवरील हल्ल्याने पाकिस्तान चिंतीत!

    दिनांक :10-Sep-2026
Total Views |
सना,
saudi arabia मध्य पूर्वेतील वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर हुथी बंडखोरांकडून सौदी अरेबियावर करण्यात आलेल्या हल्ल्याने पाकिस्तानची चिंता वाढली आहे. या हल्ल्यात ७३ जण जखमी झाल्यानंतर सौदी अरेबियाने येमेनमध्ये प्रत्युत्तरादाखल हवाई हल्ले केले. या घडामोडीनंतर पाकिस्तानने सौदी अरेबियासोबतच्या संरक्षण कराराचा दाखला देत इराणला हुथी बंडखोरांवर प्रभाव टाकून त्यांना सौदी अरेबियावर हल्ले करण्यापासून रोखण्याचे आवाहन केले आहे.
 
 
saudi arabia
 
पाकिस्तान आणि सौदी अरेबिया यांच्यात संरक्षण करार असल्याने सौदीवर झालेल्या हल्ल्याला पाकिस्तानने गांभीर्याने घेतले आहे. हुथींकडून सौदी अरेबियावरील हल्ले सुरूच राहिल्यास परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते, असा संदेश पाकिस्तानने दिला आहे. हुथी बंडखोरांना इराणचा पाठिंबा असल्याचा आरोप यापूर्वीही होत आला आहे. त्यामुळे आपल्या प्रभावाचा वापर करून हुथींना नियंत्रणात ठेवावे, अशी थेट मागणी पाकिस्तानने इराणकडे केली आहे.
 
याचदरम्यान येमेनमधील मोचा शहरावर हुथींनी ताबा मिळवल्याने तांबड्या समुद्राच्या परिसरातील सुरक्षेचा प्रश्नही अधिक गंभीर झाला आहे. तांबड्या समुद्राजवळ असलेले मोचा भौगोलिकदृष्ट्या महत्त्वाचे शहर असून, तेथील नियंत्रणामुळे हुथींचा बाब-अल-मंदेब सामुद्रधुनीपर्यंतचा प्रवेश वाढण्याची शक्यता आहे. बाब-अल-मंदेब हा तांबड्या समुद्राला एडनच्या आखाताशी जोडणारा आंतरराष्ट्रीय सागरी व्यापारासाठी महत्त्वाचा मार्ग आहे. त्यामुळे या भागातील संघर्षाचा परिणाम जहाजवाहतूक आणि सागरी व्यापारावर होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
 
सौदी अरेबियाने हुथींच्या हल्ल्याला येमेनमध्ये हवाई कारवाईने प्रत्युत्तर दिल्याने पाकिस्तान, इराण, सौदी अरेबिया आणि हुथी बंडखोर यांच्यातील तणाव आणखी वाढण्याची शक्यता आहे. पाकिस्तानकडून सौदीसोबतच्या संरक्षण कराराचा उल्लेख करण्यात आल्याने या संघर्षाचा व्यापक परिणाम होण्याची शक्यताही चर्चेत आली आहे. आता पाकिस्तानच्या इशाऱ्यावर इराणची भूमिका काय असेल आणि हुथी बंडखोरांकडून पुढील काळात कोणती पावले उचलली जातील, याकडे संपूर्ण प्रदेशाचे लक्ष लागले आहे.