सेलू,
bor-dam-project सेलू तालुक्यातील बोरधरण प्रकल्पग्रस्तांच्या मोबदल्यासंदर्भात आज १० रोजी झालेल्या सुनावणीत सकारात्मक चर्चा झाली. बोर व्याघ्र प्रकल्पाचे सहाय्यक वनसंरक्षक तथा प्रथम अपिलीय अधिकारी आशिष देशमुख यांच्या उपस्थितीत ही सुनावणी झाली. बोरधरण प्रकल्पग्रस्त संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मेश्राम रा. उचेगाव ता. दारव्हा जि. यवतमाळ हे दहा वर्षांपासून बोरधरण प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांचा सूक्ष्म अभ्यास करून सातत्याने संघर्ष करीत आहेत. संबंधित वरिष्ठ विभागांकडे लेखी तक्रारी, विनंती अर्ज तसेच विविध मागण्यांच्या माध्यमातून ते सातत्याने पाठपुरावा करीत असून, संबंधित विभागाच्या अधिकार्यांकडूनही त्यांना कायदेशीर व प्रशासकीय स्वरूपात उत्तरे दिली जात आहेत.

याच अनुषंगाने जिल्हाधिकार्यांनी दिलेल्या लेखी आदेशानुसार बोरधरण प्रकल्पग्रस्तांच्या १०५ कोटी २७ लाख रुपयांच्या निधीच्या प्रश्नावर चर्चा करण्यात आली. जिल्हाधिकारी वर्धा यांच्या लेखी आदेशासह नागपूर येथील प्रादेशिक उपायुक्त यांच्या स्तरावरून झालेल्या कार्यवाहीच्या अनुषंगाने बोर प्रकल्पग्रस्तांच्या आठही गावातील नागपूर व वर्धा जिल्ह्यातील हजारो गरीब प्रकल्पग्रस्त कुटुंबांच्या परिस्थितीचा विचार करण्यात आला. गेल्या दहा वर्षांपासून सूर्योदय संघटनेच्या माध्यमातून प्रकल्पग्रस्तांच्या प्रश्नांसाठी सुरू असलेल्या संघर्षाची दखल घेत, आजच्या सुनावणीत सहाय्यक वनसंरक्षक देशमुख यांनी मोबदल्याच्या प्रश्नांवर सकारात्मक भूमिका घेत चर्चा केल्याचे संघटनेच्या पदाधिकार्यांनी सांगितले.
या सुनावणीस संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष ज्ञानेश्वर मेश्राम, शंकर पानबुडे, दिलीप राजेंद्र यांच्यासह संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. प्रकल्पग्रस्तांच्या हक्काचा मोबदला मिळण्यासाठी गेल्या दशकभरापासून सुरू असलेल्या पाठपुराव्याला आजच्या सकारात्मक चर्चेमुळे नवी दिशा मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.