‘प्रसाद ओक’ म्हटलं की आता ‘धर्मवीर आनंद दिघे’च!

फडणवीसांच्या गौरवोद्गारांनी अभिनेता भावूक

    दिनांक :10-Sep-2026
Total Views |
मुंबई

prasad oak मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेता, दिग्दर्शक आणि परीक्षक म्हणून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या प्रसाद ओकच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला आहे. 62व्या महाराष्ट्र राज्य मराठी चित्रपट पुरस्कार सोहळ्यात प्रसाद ओक यांना ‘चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले. पुरस्कार स्वीकारताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसाद ओक यांच्या आजवरच्या कलाप्रवासाचे, तसेच विशेषतः ‘धर्मवीर’ चित्रपटातील आनंद दिघे यांच्या भूमिकेचे भरभरून कौतुक केले.
 

prasad oak honored with chhatrapati v. shantaram special contribution award 
प्रसाद ओक यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्त्वाचा उल्लेख करताना फडणवीस यांनी अभिनयासोबतच दिग्दर्शन आणि मनोरंजन क्षेत्रातील विविध जबाबदाऱ्या ते प्रभावीपणे सांभाळत असल्याचे नमूद केले. लोकप्रिय ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमात परीक्षक म्हणून बजावत असलेल्या त्यांच्या भूमिकेचाही मुख्यमंत्र्यांनी विशेष उल्लेख केला.
प्रसाद ओक यांच्या अभिनय कारकिर्दीत आनंद दिघे यांची साकारलेली भूमिका विशेष चर्चेचा विषय ठरली आहे. याच भूमिकेचा संदर्भ देताना फडणवीस म्हणाले की, विष्णुपंत पागनीस यांचे नाव घेतले की संत तुकारामांची प्रतिमा डोळ्यांसमोर उभी राहते, तर निळू फुले म्हटले की त्यांनी साकारलेल्या प्रभावी राजकीय व्यक्तिरेखा आठवतात. त्याच धर्तीवर आता ‘प्रसाद ओक’ म्हटले की प्रेक्षकांच्या मनात ‘धर्मवीर आनंद दिघे’ यांची प्रतिमा निर्माण झाली आहे, असे त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्र्यांच्या या गौरवोद्गारांनी प्रसाद ओक भावूक झाले. त्यांनी जागेवरून उठून देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर हात जोडत नतमस्तक होऊन कृतज्ञता व्यक्त केली. पुरस्कार सोहळ्यातील हा भावनिक क्षण उपस्थितांचेही लक्ष वेधून घेणारा ठरला.
फडणवीस यांनी प्रसाद ओक यांच्या आगामी कामाबाबतही उत्सुकता व्यक्त केली. भविष्यात ते राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांची भूमिका साकारणार असल्याचा संदर्भ देत, पुढील काळात ‘प्रसाद ओक म्हणजे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज’ असे म्हणण्याची वेळ येऊ शकते, असे त्यांनी नमूद केले. एखाद्या भूमिकेत पूर्णपणे समरस होण्याची प्रसाद ओक यांची क्षमता उल्लेखनीय असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी अधोरेखित केले.
आनंद दिघे यांना प्रत्यक्ष पाहिलेले नसलेल्या पिढीसाठी प्रसाद ओक यांनी पडद्यावर साकारलेली व्यक्तिरेखा इतकी प्रभावी आणि हुबेहुब आहे की, त्यांच्या मनात आनंद दिघे यांची प्रतिमा कदाचित कायमस्वरूपी याच रूपात राहील, असेही फडणवीस यांनी सांगितले. त्यामुळे ‘चित्रपती व्ही. शांताराम विशेष योगदान पुरस्कार’ हा सन्मान स्वीकारतानाच प्रसाद ओक यांच्या ‘धर्मवीर’मधील भूमिकेवर झालेल्या या कौतुकाने पुरस्कार सोहळ्याला विशेष भावनिक आणि संस्मरणीय वळण मिळाले.