मुंबई
rani mukerji बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्री राणी मुखर्जी सध्या तिच्या अभिनयामुळे नव्हे, तर एका खास आणि भावनिक क्षणामुळे चर्चेत आली आहे. मुंबईत पार पडलेल्या 62व्या महाराष्ट्र राज्य चित्रपट पुरस्कार सोहळ्यात राणी मुखर्जीला स्वर्गीय राज कपूर विशेष योगदान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. हा पुरस्कार स्वीकारताना तिने केलेले मराठी भाषण आणि तिचा मराठमोळा लूक उपस्थितांसह सोशल मीडियावरही चर्चेचा विषय ठरला.
या विशेष सोहळ्यासाठी राणीने हिरव्या रंगाची आकर्षक साडी नेसली होती. साडीला असलेल्या लाल पदरामुळे तिचा पारंपरिक लूक अधिकच खुलून दिसत होता. हिरव्या बांगड्या, गळ्यात मंगळसूत्र आणि केसांमध्ये माळलेला गजरा यामुळे तिचा संपूर्ण अंदाज अगदी मराठमोळा दिसत होता. तिच्या या पारंपरिक वेशभूषेने पुरस्कार सोहळ्यात उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.
मात्र, राणीच्या लूकपेक्षाही तिच्या मराठी भाषणाने अधिक चर्चा रंगली. पुरस्कार स्वीकारल्यानंतर तिने आपल्या भावना मराठी भाषेत व्यक्त करण्यास सुरुवात केली. महाराष्ट्र हे केवळ एक राज्य नसून आपली जन्मभूमी आणि कर्मभूमी असल्याची भावना तिने यावेळी व्यक्त केली. मुंबईतच आपले बालपण गेले असून याच शहराने आपल्याला आयुष्याचे तसेच सिनेमाचे अनेक धडे दिले, असे राणीने सांगितले.
आपल्या भाषणाची सुरुवात मराठीत करत राणी म्हणाली, “माझ्यासाठी महाराष्ट्र एक राज्य नाही. महाराष्ट्र ही माझी जन्मभूमी आहे, माझी कर्मभूमी आहे आणि माझ्या आयुष्यातील एक अविभाज्य भाग आहे. माझा जन्म मायानगरी मुंबईत झाला. मी माझं यश, अपयश.. सर्वकाही इथेच पाहिलं. प्रत्येक क्षण इथेच जगले.”
राज कपूर यांच्या नावाने दिला जाणारा हा पुरस्कार स्वीकारताना अभिमान वाटत असल्याचेही तिने नमूद केले. “हे पारितोषिक मला राज कपूर यांच्या नावानं दिलं जातंय, याचा मला अभिमान आहे. मी लहान वयात सिनेसृष्टीत आले, त्यावेळी मला कुठपर्यंत जायचंय हे सुद्धा माहीत नव्हतं. मी देशातील महिला आणि तिची शक्ती चित्रपटातून दाखवण्याचा प्रयत्न केला. सिनेमाकडे मी कधीच व्यवसाय म्हणून पाहिलं नाही, ती माझ्यासाठी एक भावना आहे,” असे राणीने आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले.
महाराष्ट्र आणि मुंबईशी असलेल्या आपल्या भावनिक नात्याचाही तिने यावेळी आवर्जून उल्लेख केला. “महाराष्ट्र ही माझी जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे. हे पारितोषिक मी राज्याच्या नागरिकांना आणि सिनेसृष्टीतील सर्व लोकांना समर्पित करते. मुंबईने मला माझी ओळख दिली, घर दिलं, सुरक्षा दिली. त्यामुळे मुंबईचं एक वेगळं स्थान माझ्या मनात आहे,” असे तिने सांगितले.
आपल्या व्यक्तिमत्त्वाला आणि ओळखीला महाराष्ट्राने आकार दिल्याचे सांगताना राणी म्हणाली, “महाराष्ट्राचा मला अभिमान आहे. कारण मी कोण आहे, हे मला महाराष्ट्राने दाखवलं आहे. माझ्यावर हे प्रेम असंच राहू द्या. जय हिंद.. जय महाराष्ट्र.”
राणी मुखर्जीच्या या मनापासून rani mukerji व्यक्त केलेल्या मराठी भावनांनी पुरस्कार सोहळ्यातील वातावरण भावूक झाले. एका बाजूला मराठमोळ्या वेशभूषेत दिसलेली राणी आणि दुसऱ्या बाजूला अस्खलित मराठीतून महाराष्ट्राशी असलेले नाते व्यक्त करणारी तिची मनोगताची शैली यामुळे तिच्या उपस्थितीने या पुरस्कार सोहळ्याला विशेष रंगत आणली.