नागपूर
Sanskar Bharti बदलत्या काळात भारतीय संस्कृती, परंपरा आणि संस्कारांची ओळख बालमनावर रुजवून संस्कारक्षम पिढी घडविणे हे मोठे आव्हान आहे. घराघरांतून आणि समाजातून मुलांमध्ये योग्य संस्कार रुजविण्याची जबाबदारी प्रत्येकाची आहे, असे प्रतिपादन संस्कार भारतीच्या प्रांत अध्यक्ष कांचन गडकरी यांनी केले.संस्कार भारती आणि सनातन सांस्कृतिक कला व क्रीडा परिषद यांच्या संयुक्त विद्यमाने रेशीमबाग येथे आयोजित कृष्णरूप सज्जा स्पर्धेत त्या बोलत होत्या. श्रीकृष्ण आणि श्रीगणेश यांच्या माध्यमातून भारतीय संस्कृतीची ओळख बालकांना व्हावी, या उद्देशाने दोन कृष्णरूप सज्जा स्पर्धा तसेच पर्यावरणपूरक गणेशमूर्ती कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले.
रेशीमबाग येथील स्पर्धेत तीन गटांत ८३ बालकांनी सहभाग घेतला. विविध आकर्षक कृष्णरूपातील बालकांनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले. यावेळी नगरसेविका मानसी सिमले, जयंत खळतकर, डॉ. मिलिंद हरदास, अशोक बुजोणे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.जरीपटका येथे साधना सहकारी बँकेच्या सहकार्याने झालेल्या दुसऱ्या कृष्णरूप सज्जा स्पर्धेत तब्बल १६५ स्पर्धक सहभागी झाले. यावेळी विरेंद्र चांडक, घनश्याम कुकरेजा, विरेंद्र कुकरेजा, प्रमिला मथरानी यांची उपस्थिती होती.
दरम्यान, पांडे लेआउट येथील संस्कार भारतीच्या कार्यालयात पर्यावरणपूरक गणेशमूर्ती निर्मिती कार्यशाळा घेण्यात आली. ज्येष्ठ चित्रकार नाना मिसाळ आणि मूर्तिकार शंतनु इंगळे यांनी सहभागी बालकांना मार्गदर्शन केले.भारतीय संस्कृती, परंपरा आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमांना पालक व नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
सौजन्य:गजानन रानडे,संपर्क मित्र