मुंबई
sharat saxena बॉलिवूडमध्ये दमदार शरीरयष्टी, खतरनाक अंदाज आणि लक्षात राहणाऱ्या भूमिकांसाठी ओळखले जाणारे ज्येष्ठ अभिनेते शरत सक्सेना सध्या त्यांच्या प्रकृतीमुळे चर्चेत आहेत. 70 आणि 80च्या दशकापासून चित्रपटसृष्टीत सक्रिय असलेल्या शरत सक्सेना यांनी शस्त्रक्रियेपूर्वी रुग्णालयातून MRI तपासणीचे काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. हे फोटो पाहिल्यानंतर त्यांच्या चाहत्यांमध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले असून, अनेकांनी त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.
शरत सक्सेना यांनी सोशल मीडियावर एकूण चार छायाचित्रे पोस्ट केली आहेत. ही छायाचित्रे MRI कक्षातील असून, त्यात शरत उभे राहून तपासणी करून घेताना दिसत आहेत. त्यांच्या चेहऱ्यावर अस्वस्थता स्पष्टपणे जाणवत आहे. शस्त्रक्रियेपूर्वी ही तपासणी करण्यात आली असून, त्यांच्या लंबर स्पाइन म्हणजेच मणक्याच्या खालच्या भागावर शस्त्रक्रिया होणार असल्याचे त्यांनी पोस्टच्या माध्यमातून स्पष्ट केले. मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये ही MRI तपासणी करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
शरत यांच्या पोस्टनंतर चाहत्यांसह चित्रपटसृष्टीतील अनेकांनी त्यांच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली. अनेकांनी त्यांना शुभेच्छा देत लवकरात लवकर बरे होण्याची प्रार्थना केली. चाहत्यांनी पाठवलेल्या संदेशांना उत्तर देताना शरत यांनी त्यांचे आभारही मानले.
दरम्यान, चाहत्यांच्या शुभेच्छांना उत्तर देताना शरत सक्सेना यांनी आपल्या मनातील सर्वात मोठी अपेक्षाही व्यक्त केली. शस्त्रक्रियेनंतर आपण पुन्हा व्यवस्थित चालू शकेन आणि कामावर परतू शकेन, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. “उम्मीद है फिर ठीक से चल पाऊंगा और काम कर पाऊंगा,” असे त्यांनी म्हटले. पडद्यावर कायम मजबूत आणि दबंग व्यक्तिमत्त्वात दिसणाऱ्या या अभिनेत्याने आपल्या आरोग्याच्या आव्हानांदरम्यानही काम करण्याची इच्छा कायम असल्याचे या प्रतिक्रियेतून स्पष्ट झाले.
शरत सक्सेना यांचा चित्रपटसृष्टीतील प्रवासही तितकाच रंजक आहे. त्यांनी इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतले होते. अभिनयाला करिअर म्हणून स्वीकारण्याचा निर्णय त्यांच्यासाठी सहज नव्हता. सुरुवातीला त्यांच्या वडिलांनाही त्यांनी अभिनय क्षेत्रात जाण्याचा निर्णय घेतल्याचे आवडले नव्हते. मात्र, नंतर मुलाची इच्छा समजल्यानंतर त्यांनी शरत यांना या क्षेत्रात पुढे जाण्याची परवानगी दिली.
अमिताभ बच्चन यांच्या ‘बेनाम’ या चित्रपटातून 1974मध्ये शरत यांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. पुढे त्यांच्या दमदार व्यक्तिमत्त्वामुळे आणि प्रभावी स्क्रीन प्रेझेन्समुळे त्यांनी विशेषतः नकारात्मक भूमिकांमध्ये स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. मात्र, त्यांनी केवळ खलनायकाच्या भूमिकांपुरते स्वतःला मर्यादित ठेवले नाही. कॉमेडी, वडिलांच्या भूमिका आणि विविध सहाय्यक व्यक्तिरेखाही त्यांनी तितक्याच प्रभावीपणे साकारल्या.
सुमारे 250हून अधिक चित्रपटांमध्ये काम केलेल्या शरत सक्सेना यांनी हिंदीसोबतच तेलुगू, तमिळ आणि मल्याळम चित्रपटांमध्येही अभिनय केला आहे. 1987च्या गाजलेल्या ‘मिस्टर इंडिया’मध्ये त्यांनी मोगॅम्बोचा साथीदार डागा ही भूमिका साकारली होती. ‘बजरंगी भाईजान’मध्ये ते करीना कपूरच्या वडिलांच्या भूमिकेत दिसले. तर ‘हेरा फेरी’मधील तोतला सेठच्या भूमिकेत त्यांच्या विनोदी अभिनयाने प्रेक्षकांचे विशेष मनोरंजन केले. याशिवाय ‘त्रिदेव’, ‘घायल’, ‘खिलाडी’, ‘सोल्जर’ आणि ‘बागबान’ यांसारख्या चित्रपटांतील त्यांच्या भूमिका आजही प्रेक्षकांच्या स्मरणात आहेत.
शरत सक्सेना यांनी एका मुलाखतीत आपल्या कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळातील आठवणी सांगताना सलीम-जावेद या लोकप्रिय लेखन जोडीचाही उल्लेख केला होता. सुरुवातीच्या काळात छोट्या भूमिका मिळवून देण्यात सलीम-जावेद यांची महत्त्वाची भूमिका असल्याचे त्यांनी सांगितले होते.
पुढे शरत यांनी सलमान खानसोबत ‘तुमको ना भूल पाएंगे’ या चित्रपटात काम केले. या चित्रपटात दोघांनी वडील आणि मुलाची भूमिका साकारली होती. शरत यांच्या म्हणण्यानुसार, या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान सलमानने त्यांच्याशी नेहमी संपर्कात राहण्याचे आणि त्यांची काळजी घेण्याचे आश्वासन दिले होते. सलमान खान जेव्हा जेव्हा चित्रपटाची निर्मिती करतो, तेव्हा आपल्याला कामासाठी बोलावले जाते, असेही शरत यांनी सांगितले होते. त्यामुळे सलमान खान आणि त्याच्या कुटुंबीयांप्रती आपण कायम कृतज्ञ असल्याचेही त्यांनी यापूर्वी नमूद केले आहे.
आता शस्त्रक्रियेपूर्वी शरत सक्सेना यांनी शेअर केलेल्या MRIच्या छायाचित्रांमुळे त्यांच्या चाहत्यांचे लक्ष त्यांच्या प्रकृतीकडे वेधले गेले आहे. शस्त्रक्रियेनंतर पुन्हा व्यवस्थित चालता यावे आणि कामाच्या ठिकाणी परतता यावे, हीच त्यांची अपेक्षा असून, चाहत्यांकडूनही त्यांच्या लवकर प्रकृतीसुधारणेसाठी शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.