ओटावा,
us-canada-trade-warअमेरिकेने कॅनडातून आयात होणारे दुग्धजन्य पदार्थ, मद्य आणि दुचाकीवर बंदी जाहीर केली आहे. व्यापार करार नाकारल्याने कॅनडाच्या उत्पादनांवर बंदी घालण्यात आल्याची माहिती राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी समाज माध्यमावरील पोस्टमधून दिली.
दुसरीकडे प्रत्युत्तर म्हणून कॅनडाने सुमारे २० अब्ज डॉलर्स किमतीच्या अमेरिकन वस्तूंवर शुल्क लादले आहे. ट्रम्प यांनी प्रमुख आणि दीर्घकालीन अमेरिकन सरकारी कंत्राटांमधून कॅनेडियन उत्पादने वगळण्याचा निर्णय घेतला. कॅनडाने प्रत्युत्तरात्मक शुल्क लादल्यानंतर आणि पंतप्रधान मार्क कार्नी यांनी अमेरिकेवरील देशाचे अवलंबित्व कमी करण्याचे प्रयत्न अधिक तीव्र करण्याच्या आश्वासनानंतर हे पाऊल उचलण्यात आले आहे. कार्नी यांनी अमेरिकेकडून उत्पादनांवर घालण्यात आलेल्या बंदीचा निषेध करत म्हटले की, कॅनडाचे सध्याचे धोरण अधिक स्वतंत्र आणि आत्मनिर्भर बनण्याचे आहे. कोणताही देश आम्हाला ओलीस ठेवू शकणार नाही आणि आम्ही आमच्या इच्छेनुसार आमचे जीवन जगू शकू, हे सुनिश्चित करणे हा उद्देश आहे.
कॅनडाला संघर्ष वाढवायचा नाही, परंतु कामगारांचे संरक्षण करण्यासाठी प्रत्युत्तरात्मक शुल्क आवश्यक होते. अमेरिकेच्या एकूण मागण्यांवरून असे दिसून येते की, आपण त्यांच्यावर कमी नव्हे, तर अधिक अवलंबून राहावे अशी त्यांची इच्छा आहे. अनेक क्षेत्रांमध्ये, त्यांना खरी आर्थिक भागीदारी नव्हे, तर परस्परावलंबन हवे होते.