एआयच्या विस्तारामुळे मानवजातीचा होणार विनाश?

अँथ्रोपिक कंपनीच्या वरिष्ठ संशोधकांचा दावा, सुरक्षा, नियंत्रणाचा प्रश्न होणार अधिक जटील

    दिनांक :10-Sep-2026
Total Views |
नवी दिल्ली,
ai lead to the destruction of humanity मनोरंजनापासून वैद्यकीय उपचारांपर्यंत आणि शेअर बाजारापासून खासगी ते सरकारी प्रशासनापर्यंत सर्वच क्षेत्रांमध्ये एआय अर्थात् कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर वाढला आहे. एआयच्या वेगाने होणाऱ्या विस्तारामुळे पुढील दशकात संपूर्ण मानवजातीचा विनाश होण्याची शक्यता १० टक्क्यांपेक्षा जास्त आहे, असा धक्कादायक इशारा अँथ्रोपिक कंपनीच्या वरिष्ठ संशोधकांनी दिला आहे. सुरक्षा आणि नियंत्रणाचा प्रश्न अधिक जटील होणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
 
 
ai lead to the destruction of humanity
 
जगभरात एआयचा झपाट्याने विस्तार होत असला तरी या तंत्रज्ञानामुळे मानवी अस्तित्वाच्या खुणा पुसल्या जाऊ शकतात, असा इशारा कंपनीच्या अलाइनमेंट सायन्स विभागाचे प्रमुख इव्हान हुबिंगर यांनी एक्सवरील पोस्टमधून दिला आहे. अँथ्रोपिक ही कंपनी कृत्रिम बुद्धिमत्ता प्रणाली विकसित करणाऱ्या आघाडीच्या कंपन्यांपैकी एक मानली जाते. याच कंपनीचे प्रमुख अधिकारी इव्हान हुबिंगर यांनी म्हटले की, एआयमुळे सर्व मानवजातीचा विनाश होऊ शकतो यावर आमचा विश्वास आहे. पुढील दशकात असे घडण्याची शक्यता १० टक्क्यांपेक्षा जास्त असल्याचे मला वैयक्तिकरीत्या वाटते. ही समस्या सोडवण्यासाठी अँथ्रोपिक सर्वोत्तम प्रयत्न करेल यावर माझा ठाम विश्वास आहे.
 
 
मात्र, ‘सुपरइंटेलिजन्स’च्या सुरक्षेचा आणि नियंत्रणाचा प्रश्न सोडवण्यासाठी सध्या आमच्याकडे कोणतीही ठोस योजना नाही. आम्ही भविष्यातील एआय प्रणाली अनपेक्षित किंवा विध्वंसक पद्धतीने कशा प्रकारे वागू शकतात आणि त्यांच्या सुरक्षेची काटेकोर चाचणी कशी घेता येईल याचा सातत्याने अभ्यास करत आहे. यापूर्वीच्या अभ्यासात काही कृत्रिम परिस्थितींमध्ये एआय प्रणाली धमकी अथवा भीती दाखवण्याचे वर्तन केल्याचेही समोर आले आहे. सायबर सुरक्षेच्या मूल्यांकनादरम्यान या प्रणालीने गोपनीय पासवर्ड चोरले आणि आपले कार्य पूर्ण करण्याच्या नादात थेट डिजिटल पायाभूत सुविधांवरच सायबर हल्ले चढवले.
मानवी क्षमता मागे पडू शकते
एआयच्या झपाट्याने होणाऱ्या विस्तारामुळे या प्रणालींचे कार्य समजून घेणे, त्यांच्यावर देखरेख ठेवणे आणि त्यांना नियंत्रणात ठेवण्याची मानवी क्षमता मागे पडू शकते, अशी भीती अँथ्रोपिक कंपनीत काम करणारे माजी संशोधक जेकब कॉक्सन यांनी दिला होता. त्यांनी एआय कंपन्यांवर मानवी जीव धोक्यात घालून स्वतःमध्येच सुधारणा घडवून आणणाऱ्या ‘सुपरइंटेलिजन्स’च्या निर्मितीसाठी धावत असल्याचा थेट आरोप केला. संशोधकांना एआयमुळे निर्माण होणाऱ्या संभाव्य धोक्यांची जाणीव आहे. मात्र, या क्षेत्रातील तीव्र स्पर्धेमुळे ते या शर्यतीतून माघार घेण्यास तयार नाहीत.
तंत्रज्ञानाच्या विकासाचा वेग कल्पनेपलीकडे
आधुनिक एआयचे वर्णन करताना पोकोस्की सांगतात की, हे तंत्रज्ञान पारंपारिक कोडिंग किंवा प्रोग्रामिंगद्वारे तयार करण्यात आलेले नसून ते मोठ्या प्रमाणावर डेटा आणि माध्यमातून एखाद्या जीवासारखे वाढवले गेले आहे. परिणामी या प्रणालीच्या अंतर्गत विचारप्रक्रियेचे कामकाज माणसाला पूर्णपणे समजून घेणे आता अशक्यप्राय आहे. ही प्रणाली स्वतःची विचारप्रक्रिया लपवण्यात आणि दिशाभूल करण्यात अत्यंत पटाईत असून कोणताही विचार उघड न करता अनेक गुंतागुंतीची कामे परस्पर सोडवण्यास सक्षम होत आहेत.