नागपूर,
21 killed in 3 accidents in Maharashtra महाराष्ट्रात गुरुवारी तीन वेगवेगळ्या ठिकाणी झालेल्या भीषण रस्ते अपघातांनी काळजाचा ठोका चुकवला. अहिल्यानगर, भंडारा आणि नांदेड जिल्ह्यांत झालेल्या या दुर्घटनांमध्ये एकूण २१ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनांमध्ये काही कुटुंबांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून नातेवाईकांच्या भेटीसाठी निघालेल्या प्रवाशांचा प्रवास मृत्यूच्या दाढेत संपला. तिन्ही घटनांनंतर संबंधित परिसरात शोककळा पसरली आहे. भंडारा जिल्ह्यातील लाखनी-साकोली मार्गावरील पिंपळगावजवळ आयशर आणि ट्रॅक्स वाहनाची पहाटेच्या सुमारास धडक झाली. छत्तीसगडहून नागपूरकडे जाणाऱ्या या वाहनात महिला आणि लहान मुले प्रवास करत होती. प्राथमिक माहितीनुसार वाहनांमध्ये १६ ते १७ जण होते. अपघात इतका भीषण होता की घटनास्थळीच ८ जणांचा मृत्यू झाला, तर नागपूरला उपचारासाठी हलविण्यात येत असलेल्या आणखी एका महिलेचा वाटेत मृत्यू झाला. त्यामुळे या दुर्घटनेतील मृतांचा आकडा ९ वर पोहोचला आहे. मृतांमध्ये ६ महिला आणि ३ बालकांचा समावेश असून एका महिलेचे वय ५५ वर्षे होते, तर इतर महिला ३५ वर्षांच्या वयोगटातील होत्या. तीनही बालके पाच वर्षांखालील आहेत. तिज उत्सवासाठी छत्तीसगडहून नागपूरमधील माहेरी येत असताना या महिलांवर काळाने घाला घातला. सोमनाथ वर्मा यांच्या कुटुंबातील आई, बहीण, भाची आणि बहिणीची जाऊबाई अशा चौघांचा या दुर्घटनेत मृत्यू झाला. तीन बालकांवर भंडारा मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू असून इतर जखमींना नागपूर मेडिकल कॉलेजमध्ये हलविण्यात आले आहे. वाहन चालक बचावला असून त्याच्यावर भंडारा मेडिकल कॉलेजमध्ये उपचार सुरू आहेत. या घटनेचा तपास लाखनी पोलिसांकडून केला जात आहे.

अहिल्यानगर-कल्याण महामार्गावरील भाळवणी शिवारात हॉटेल संदीपसमोर गुरुवारी पहाटे सुमारे २ वाजता आयशर टेम्पो आणि वॅगनर कारची समोरासमोर जोरदार धडक झाली. या दुर्घटनेत कारमधील एकाच कुटुंबातील शकील शेख, सलमा शेख, इकबाल शेख आणि सुमैय्या शेख यांचा मृत्यू झाला. हे सर्व मुंबईतील मालवणी येथील रहिवासी असल्याची माहिती आहे. शकील शेख हे कुटुंबासह अहिल्यानगरमधील नातेवाईकांना भेटण्यासाठी कार क्रमांक एमएच ४७ सीके १३०८ मधून प्रवास करत होते. भाळवणी येथे त्यांच्या कारला आयशर टेम्पो क्रमांक एमएच १६ सीडी २७४७ ने समोरून धडक दिली. कारचा चक्काचूर झाल्याने चौघेही गंभीर जखमी झाले. स्थानिक नागरिकांनी तातडीने त्यांना पारनेर ग्रामीण रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर चौघांनाही मृत घोषित केले. अपघातानंतर आयशर चालक घटनास्थळावरून निघून गेल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले असून अल्ताफ शब्बीर शेख (वय ५२, रा. मुकुंदनगर, अहिल्यानगर) यांनी पारनेर पोलिसांत फिर्याद दिली आहे. पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, नांदेड-भोकर मार्गावरही गुरुवारी १० सप्टेंबर रोजी सायंकाळी सुमारे ६ वाजता ट्रक आणि पिकअप वाहनाची समोरासमोर धडक झाली. या अपघातात ८ जणांचा जागीच मृत्यू झाला, तर ७ जण गंभीर जखमी झाले. मृतांमध्ये पती-पत्नी तसेच दोन सख्ख्या भावांचा समावेश आहे. मृतांमध्ये पांडुरंग लिंगू वाघमारे, त्यांची पत्नी लक्ष्मीबाई वाघमारे, मोबाइल दुरुस्तीचे काम करणारे सय्यद अल्तमेश सय्यद अलीमोद्दीन, टाटा मॅजिक चालक शेख फिरोज, बलवान पवार, शाहीद सौदागर आणि कृष्णा पवार यांचा समावेश आहे. एका मृताची ओळख अद्याप पटलेली नाही. जखमींमध्ये सोमनाथ मारोती येळणे, शेख रेहान (१६), शेख जलील (६०), पिंटु धुर्वे, रेखा बडगे (४०), शेख खलील शेख वहीद आणि शेख बाबुमिया यांचा समावेश आहे. सर्व जखमींना नांदेडच्या शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. पोळ्याच्या सणाच्या दिवशी झालेल्या या दुर्घटनेमुळे भोकर तालुक्यावर दुःखाचे सावट पसरले आहे.