भंडारा,
9 killed in accident in Bhandara राष्ट्रीय महामार्गावर लाखनी जवळील पिंपळगाव परिसरात झालेल्या अपघातात नऊ जणांचा मृत्यू, तर 9 जण जखमी झाले आहेत. आज 11 रोजी पहाटे पाच वाजताच्या सुमारास ही दुर्दैवी घटना घडली. जखमींवर भंडारा येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहे. छत्तीसगड राज्यातील काही महिला कार्यक्रमा निमित्त एकत्रित येत पिकअप वाहनाने नागपूरच्या दिशेने जात होत्या. राष्ट्रीय महामार्गावर लाखनीच्या अलीकडे असलेल्या पिंपळगाव येथील मोटघरे पेट्रोल पंप आणि भाऊचा ढाबा या दरम्यान एक ट्रक पेट्रोल पंपावरून महामार्गावर येत असताना वेगात येत असलेले पिकअप वाहन जोरात ट्रकवर मागेहून आदळळे. हा अपघात इतका भीषण होता की, वाहनाचा पूर्ण चेंदामेंदा झाला.
दरम्यान घटनास्थळीच अपघातातील आठ जणांचा मृत्यू झाला होता. तर एक जण उपचारादरम्यान रुग्णालयात दगावला. मृतांमध्ये सहा महिला आणि 3 लहान मुलांचा समावेश असल्याची माहिती आहे. तर नऊ जण जखमी झाले असून त्यांच्यावर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय भंडारा येथे उपचार सुरू आहे. जखमींची अवस्था पाहता मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता आहे. घटनेची माहिती होताच गडेगाव येथील महामार्ग पोलिस मदत केंद्राचे प्रमुख रवींद्र रेवतकर हे आपल्या सहकाऱ्यांसह, भंडारा पोलिसांचे अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि ग्रामस्थांच्या सहकार्याने मदत कार्य सुरू केले. मृतक व जखमींच्या नावांची खात्री केली जात असल्याची माहिती रवींद्र रेवतकर यांनी तभाला दिली.