मुंबई,
Aditya Thackeray's warning महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या (एमपीएससी) कारभारावरून राजकीय वातावरण तापले आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी एमपीएससीचे अध्यक्ष विवेक भीमनवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. विविध मागण्यांसाठी त्यांनी महाराष्ट्राचे राज्यपाल जिष्णू देव वर्मा यांची भेट घेतली. एमपीएससीच्या परीक्षांमध्ये झालेल्या कथित गैरप्रकारांची एसआयटीपुरती चौकशी न करता न्यायालयीन चौकशी करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी राज्यपालांकडे केली. राज्यपालांनी या प्रकरणात लक्ष घालण्याचे आश्वासन दिल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले.

धाराशिव जिल्ह्यातील एका विद्यार्थ्याने आत्महत्या केल्याचा मुद्दाही आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला. या विद्यार्थ्याच्या कुटुंबीयांची कैलास पाटील यांनी भेट घेतल्याचे त्यांनी सांगितले. नोकरभरती परीक्षांमध्ये सुधारणा करण्यासाठी व्ही. राधा यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. मात्र, विद्यमान अध्यक्ष आणि सचिव पदावर असतानाच या सुधारणा कितपत प्रभावीपणे होतील, असा सवाल आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला. पेपरफुटीचे पुरावे असल्याचा दावा विद्यार्थी करत असून, विशिष्ट वर्गातील किंवा ट्यूशन क्लासमधील व्यक्तींना परीक्षेत फायदा मिळत असल्याचेही ते म्हणाले.
एमपीएससी अध्यक्ष विवेक भीमनवार यांनी राजीनामा न दिल्यास त्यांच्याकडून राजीनामा घेण्यासाठी आंदोलन आणखी तीव्र केले जाईल, असा इशारा आदित्य ठाकरे यांनी दिला. हे आंदोलन सध्या जिल्ह्याजिल्ह्यांत सुरू असून, पुढील काळात जिल्हे आणि तालुक्यांमधून विद्यार्थी मुंबईत दाखल होऊन मोठे आंदोलन करतील, असे त्यांनी म्हटले. व्ही. राधा समितीने सुचवलेल्या सुधारणा एका बाजूला असताना, ज्या अध्यक्षांच्या कार्यकाळात पेपरफुटीचा प्रकार घडल्याचा आरोप आहे, त्यांनाच समितीत ठेवले तर कथित दलालांचे रॅकेट कसे मोडणार, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. भीमनवार यांच्यावर यापूर्वी झालेले आरोप आणि त्यांच्या संपत्तीची माहिती विद्यार्थी समोर आणतील, असा दावाही त्यांनी केला. विद्यार्थ्यांवर अन्याय होत असल्यास राजकीय पक्षांनी त्यांच्या बाजूने उभे राहणे आवश्यक असल्याचे आदित्य ठाकरे यांनी सांगितले. तसेच मराठा, ओबीसी, धनगर आणि आदिवासी समाजाच्या प्रश्नांवरूनही त्यांनी सरकारवर निशाणा साधला. आंदोलने सुरू झाल्यानंतर सरकारकडून त्याकडे पुरेसे लक्ष दिले जात नसल्याचा आरोप करत, आंदोलनांमध्ये फूट पाडण्यासाठी मंत्र्यांना पाठवले जात असल्याचेही त्यांनी म्हटले.