भंडारा,
Bhandara accident news माहेर जवळ करण्यासाठी रात्रीच त्या प्रवासाला निघाल्या! माहेरवासासाठी घेऊन जाण्यासाठी आलेली आई, भाऊ यांच्यासोबत लेकरांना घेऊन निघालेल्या "त्या" मायमाऊलींची माहेराची वाट अर्ध्यावरच थांबली अन लेकरांना पोरकी करून गेली. अकाली आलेल्या या विसाव्याने वर्मा कुटुंबासह इतरही कुटुंब हादरले. नऊ लोकांच्या जाण्याच्या वेदना जेवढ्या दुःखदायी होत्या, तेवढ्याच रुग्णालयाच्या आवारात आपल्या आईला शोधणाऱ्या लेकरांच्या "त्या" नजराही... परिस्थिती समोर हतबल झालेल्या
नातेवाईकांकडेही त्या भिरभिरणाऱ्या नजरांसाठी उत्तर नव्हते...
नियतीच्या मनातील कधीच कोणी ओळखले नाही! माहेरी जाऊन माहेर सुख उपभोगण्याच्या आनंदात असणाऱ्या त्या अनेक लेकींना हा आपला शेवटचा प्रवास असेल असे वाटले ही नसावे. लेकरांना सोबत घेऊन सुरू झालेला प्रवास, त्यांना वाटेतच अर्धवट सोडून थांबविला, तो कायमचा, माहेरच्या अंतहीन प्रतीक्षा करावयास लावून.छत्तीसगढी बांधवांमध्ये तिजा उत्सवाची परंपरा आहे. या सणासाठी सासरी असलेल्या लेकी माहेरी येऊन आपल्या अखंड सौभाग्यासाठी प्रार्थना करतात. या लेकींना सासरी जाऊन सोबत घेऊन येण्याची प्रथा आहे. छत्तीसगड राज्यातील अनेक कुटुंब कामानिमित्त नागपुरात स्थायिक झाले. मात्र या कुटुंबातील मुलींचे विवाह त्यांच्याच राज्यात झाले आहेत. यातीलच काही लेकी एकत्र येत सणासाठी माहेरी नागपूरकडे निघाल्या. यातील मिनाक्षी वर्मा यांना घेण्यासाठी त्यांची आई जाणबाई व भाऊ गुलशन गेला होता. 21 जणांना घेऊन छत्तीसगड राज्यातील विचारपुर येथून निघालेले वाहन अपघातग्रस्त होऊन 9 जणांचा जीव गेला. माहेरी निघालेल्या 6 मुली आणि त्यांच्या 3 लेकरांचा प्रवास अर्ध्यावरतीच थांबला... माहेराची ओढ अपघाताने कायमची हिरावून घेतली... यांचा अकाली विसावा माहेरच्या मंडळींना अंतहीन प्रतीक्षा देऊन गेला. एकीकडे दोन दिवसाने, आनंदोत्सव साजरा होणार असताना या माहेरवासीनींवर झालेला आघात मन सुन्न करणारा आहे.
या अपघातात वर्मा कुटुंबाने सर्वस्व गमावले. मुलीला घ्यायला गेले आई, तिची मुलगी, मुलीची मुलगी आणि जाऊ कुटुंबियांपासूनकाळाने हिरावून घेतली. एकाच कुटुंबातील चार जणांचा झालेला मृत्यू व्यक्त होणाऱ्या दुःखापेक्षा कितीतरी वेदनादायी होता! या लेकरांनी आपली माय गमावली, ती अवघ्या तीन-चार वर्षाची मुले भिरभिरणाऱ्या नजरेने रुग्णालयाच्या परिसरात आपल्या आईला शोधत होती. आईसाठी रडणाऱ्या लेकरांच्या डोळ्यातील आसवे बरेच काही सांगून जातं होते. यावेळी परिस्थितीही हतबल होती, ज्यांच्या खांद्यावर ती खेळत होती, तेही मुलांची समजुत काढण्यात असमर्थ दिसत होती. शेवटी नियतीच्या पुढे सर्वकाही व्यर्थ आहे हेच या अपघाताने सिद्ध केले! वर्मा, उईके कुटुंबीयांचे आनंदाचे क्षण क्षणात दुःखाच्या आसवांनी पुसले गेले... जी बहीण, जी मुलगी घरी येणार होती तिला रुग्णालयाच्या शवागृहात पाहण्याची वेळ आली यापेक्षा मोठे दुःख काय असू शकते!