वॉशिंग्टन,
Blacklist three Indian companies भारताच्या तीन कंपन्यांनी कथितपणे सायबर हेरगिरी करून अमेरिकन नागरिक, व्यवसाय आणि वकिलांचा डेटा चोरल्याचा आरोप डेमोक्रॅटिक पक्षाचे खासदार रॉन वायडेन यांनी केला. या कंपन्यांना काळ्या यादीत टाकण्याची मागणी त्यांनी केली आहे. सनकिस्ड ऑर्गेनिक्स प्रायव्हेट लिमिटेड, बेलट्रॉक्स लिमिटेड आणि सायबररूट लिमिटेड या कंपन्यांवर डेटा चोरीचा आरोप करत त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी वायडेन यांनी ट्रम्प प्रशासनाकडे केली आहे.
या कंपन्यांनी हजारो अमेरिकन नागरिक आणि अमेरिकन कंपन्यांचा डेटा हॅक करून चोरल्याचा आरोप आहे. देशाच्या सुरक्षेसाठी या कंपन्यांना तातडीने काळ्या यादीत टाकावे असे त्यांनी निवेदनात म्हटले आहे. भारतातील अनेक सायबर भाडोत्री गट १५ वर्षांहून अधिक काळापासून अमेरिकन नागरिक, व्यवसाय आणि त्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या वकिलांविरुद्ध लक्ष्यित हेरगिरी करत आहेत. या कंपन्यांनी खटल्यांवर प्रभाव टाकण्यासाठी खासगी इक्विटी कंपन्या, औषध कंपन्या आणि अग्रगण्य अमेरिकन लॉ फर्म्समधील हजारहून अधिक वकिलांना लक्ष्य करून मोठ्या प्रमाणावर हॅकिंग मोहीम राबवली. कतार सरकारच्या सांगण्यावरून या कंपन्या काम करत असल्याचे पुरावे आहेत. त्यामुळे ट्रम्प प्रशासनाने तातडीने दखल घेऊन भारतीय कंपन्यांवर कारवाई करावी.