गोवंश कत्तलखान्यावर ‘सर्जिकल स्ट्राईक’

८३० किलो गोमांस जप्त, ७ जण पोलिसांच्या ताब्यात

    दिनांक :11-Sep-2026
Total Views |
अमरावती
cattle slaughter गोवंश कत्तलीविरोधात अमरावती ग्रामीण स्थानिक गुन्हे शाखेने धडाकेबाज कारवाई करीत पूर्णा नगरातील कसाबपुरा परिसरात सुरूअसलेल्या कत्तलखान्यावर छापा टाकला. या कारवाईत तब्बल ८३० किलो गोमांस, दोन गायी, ३१ किलो कातडी, कत्तलीसाठी वापरण्यात येणारी हत्यारे व साहित्य, रोख रक्कम आणि तीन मालवाहू वाहने असा एकूण १३ लाख ७७ हजार ६०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

strike 
 
गुन्हे शाखेचे पथक शुक्रवारी पेट्रोलिंग करीत असताना पूर्णा नगरातील कसाबपुरा येथे गोवंश कत्तल होत असल्याची गोपनीय माहिती मिळाली. पथकाने कुरेशी मोहल्ल्यात छापा टाकला. कारवाईदरम्यान ८३० किलो गोमांस अंदाजे किंमत ४ लाख १५ हजार रुपये, दोन गायी किंमत २० हजार रुपये आणि ३१ किलो कातडी किंमत ३१ हजार रुपये आढळून आले. ९ लाख किमतीची तीन मालवाहू वाहने जप्त करण्यात आली.
 
याप्रकरणी मोहम्मद जावेद अ. प्यारे (२३), मोहम्मद एजाज शेख इसा (४०), अब्दुल मोबीन अब्दुल करीम (४५), अब्दुल कदीर शेख युसूफ (४८), अन्सार अब्दुल लतिफ (५०), मकसूद अहमद बशीर अहमद (५०) आणि अब्दुल कलाम अब्दुल जब्बार (५२), सर्व रा. कसाबपुरा, पूर्णा नगर, ता. भातकुली यांच्याविरुद्ध आसेगाव पूर्णा पोलिस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
ही कारवाई पोलिस अधीक्षक निकेतन कदम व अपर पोलिस अधीक्षक दत्ता तोटेवाड यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अशोक लांडे यांच्या नेतृत्वात करण्यात आली. कारवाई करणाऱ्या पथकामध्ये पोलिस उपनिरीक्षक सतीश झाल्टे, सागर हटवार, शिवाजी घुगे, मंगेश लकडे, सचिन मसांगे, हर्षल काळे, रूपेश गावंडे, विवेक घोरमाडे, संजय प्रधान, नईम शहा, सोमेश्वर कास्देकर, अंकुश टाले, आकाश आमटे, तेजेश्वर प्रधान, रामेश्वर सुरडकर, काकासाहेब ठवरे यांनी केली.