दिल्ली उभारणार राज्य आपत्ती प्रतिसाद दल

    दिनांक :11-Sep-2026
Total Views |
नवी दिल्ली, 
delhi-sdrf-satya-niketanसत्य निकेतन येथील इमारत कोसळण्याच्या दुर्घटनेत सात जणांचा बळी गेल्यानंतर, नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्तींना प्रभावीपणे व त्वरित प्रतिसाद देण्यासाठी ‘राज्य आपत्ती प्रतिसाद दल’ स्थापन करण्याची प्रक्रिया दिल्ली सरकारने वेगवान केली आहे.
 
दिल्ली सचिवालयात मुख्यमंत्री रेखा गुप्ता आणि ‘राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दला’च्या वरिष्ठ अधिकाऱ्यांमधील बैठकीत, अत्याधुनिक ‘राज्य आपत्ती प्रतिसाद दल’ पथक उभारण्यासाठी आवश्यक माहिती व सूचना गोळा करण्यात आल्याचे दिल्लीच्या मुख्यमंत्री कार्यालयाने गुरुवारी सांगितले. ‘राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दला’च्या अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना दिल्लीत आपत्ती प्रतिसाद दल स्थापन करण्याच्या विविध पैलूंबाबत माहिती दिली. दिल्लीत ‘राज्य आपत्ती प्रतिसाद दला’ची एक बटालियन उभारली जाऊ शकते. ज्यामध्ये १,१०० पर्यंत कर्मचारी असतील, असे एका निवेदनात म्हटले आहे.
 
hjkl
ही बटालियन राज्य सरकारच्या अखत्यारीत काम करेल आणि आपत्तीच्या वेळी घटनास्थळी त्वरित पोहोचून प्रभावीपणे मदत व बचाव कार्य करू शकेल, असे मुख्यमंत्री म्हणाल्या. अपघात किंवा आपत्तीच्या वेळी उपकरणे त्वरित उपलब्ध व्हावीत यासाठी, आपत्ती व्यवस्थापन उपकरणांची यादी आणि त्यांच्या साठवणुकीचा तपशील संबंधित विभागांशी सामायिक करण्याचा निर्देश रेखा गुप्ता यांनी अधिकाऱ्यांना दिले. या बैठकीला दिल्लीचे मुख्य सचिव राजीव वर्मा, एनडीआरएफचे महासंचालक पियुष आनंद, महानिरीक्षक नरेंद्र बुंदेला आणि विविध विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. दिल्लीत एसडीआरएफ स्थापन करण्याची मागणी बऱ्याच काळापासून प्रलंबित होती, असे गुप्ता यांनी सांगितले. देशातील बहुतांश राज्यांनी आधीच स्वतःचे एसडीआरएफ स्थापन केले आहेत.
दिल्लीसारख्या दाट लोकवस्तीच्या महानगर शहरासाठी स्वतःचे एसडीआरएफ असणे ही काळाची गरज आहे. विविध कारणांमुळे मागील सरकारांच्या कार्यकाळात ही महत्त्वाची व्यवस्था साकार होऊ शकली नाही, असे त्यांनी नमूद केले.