अमरावती
ganeshotsav गणेशोत्सव शांततेत, उत्साहात आणि सुरक्षित वातावरणात पार पडावा, यासाठी अमरावती ग्रामीण पोलिसांनी कंबर कसली आहे. कायदा-सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या समाजकंटकांवर करडी नजर ठेवण्यात येत आहे. गणेशोत्सवाच्या पृष्ठभूमीवर विविध कायद्यान्वये तब्बल ३ हजार ४१० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.
अमरावती ग्रामीण पोलिस क्षेत्रात यंदा तब्बल १ हजार ५०९ सार्वजनिक मंडळांच्या गणेशमूर्तींची स्थापना होणार आहे. उत्सवासाठी पोलिसांकडून सुमारे २ हजार अधिकारी, अंमलदार आणि गृहरक्षक दलाच्या जवानांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य राखीव पोलिस दलाच्या दोन तुकड्याही तैनात करण्यात आल्या आहे. गणेश स्थापना व विसर्जन मार्गांवर वाहतूक पोलिसांची नियुक्ती करण्यात येणार आहे. ठिकठिकाणी बॅरिकेडिंग तसेच पार्किंगची व्यवस्था राहणार आहे.
संवेदनशील व अतिसंवेदनशील भागांसह गर्दीच्या ठिकाणी विशेष बंदोबस्त ठेवला जाईल. गणेश मंडळांना सीसीटीव्ही यंत्रणा अद्ययावत ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या असून, उत्सवादरम्यान ड्रोनद्वारेही नजर ठेवली जाणार आहे. कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी, यासाठी ९४८ जणांवर बीएनएसएस कलम १६३ अन्वये प्रतिबंधात्मक आदेश काढण्याची प्रक्रिया सुरू आहे. महाराष्ट्र पोलिस अधिनियमाच्या कलम ५६ अन्वये सात जणांना तडीपार करण्यात आले असून, कलम ५५ अन्वये एका टोळीला हद्दपार करण्यात आले आहे. तसेच एमपीडीए कायद्यान्वये दोघांना स्थानबद्ध करण्याचे आदेश प्राप्त झाले आहेत.
शांतता समिती, जातीय सलोखा, पोलिस मित्र समिती व गणेश मंडळांच्या एकूण २२५ बैठका घेण्यात आल्या. ध्वनिप्रदूषणाच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करून ध्वनिक्षेपक व साऊंड सिस्टीम जप्त करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे. ‘ऑपरेशन कवच’अंतर्गत नशामुक्तीबाबत जनजागृतीही करण्यात येत आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता सोशल मीडियावर आक्षेपार्ह किंवा भडकावू मजकूर प्रसारित करू नये, असे आवाहन पोलिस अधीक्षक निकेतन कदम यांनी केले आहे. संशयास्पद प्रकार आढळल्यास नागरिकांनी तातडीने ११२ वर संपर्क साधावा.