गावकर्‍यांची ठोकली ग्रामपंचायतीच्या कपाटाला ‘सील’!

५ वर्षांच्या जमा-खर्चाचा हिशेब न दिल्याचा आरोप

    दिनांक :11-Sep-2026
Total Views |
गोंदिया,
gondia news गोरेगाव तालुक्यातील कलपाथरी येथील ग्रामपंचायतीत ग्रामसभेच्या आयोजनावरून तीव्र वाद पेटला आहे. मागील पाच वर्षांच्या जमा-खर्चाचा हिशेब न दिल्याचा आरोप करत आक्रमक ग्रामस्थांनी थेट ग्रामपंचायतीच्या कपाटाला सील ठोकल्याचा प्रकार पुढे आला आहे. याप्रकरणी आता शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा ठपका ठेवत पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्याच्या सुचना गोरेगावच्या गटविकास अधिकार्‍यांनी संबंधित ग्रामपंचायत अधिकार्‍यांना दिल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे.
 
 
gondia news
 
मिळालेल्या माहितीनुसार कलपाथरी येथे २१ ऑगस्ट रोजी ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले होते. ग्रामअधिकारी गैरहजर असल्याने ग्रामसभा स्थगित करण्यात आली होती. त्यानंतर ३१ ऑगस्ट रोजी सरपंच शेषकुमार रहांगडाले यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली. दरम्यान, सायंकाळी उशिरापर्यंत सभा घेण्यात आली. सभेत मागील ५ वर्षांचा जमा-खर्च आणि दस्तऐवज सादर न केल्याचा आरोप करत गावकरी चांगलेच आक्रामक झाले व रागाच्या भरात ग्रामस्थांनी कार्यालयातील कपाटाला सील लावले. धक्कादायक बाब म्हणजे या सील लावण्याच्या कारवाईवर तेथील सरपंचांनीही स्वाक्षरी केल्याचे समोर आले आहे. दरम्यान, कपाटाला सील लावल्याने प्रशासकीय कामकाज ठप्प झाल्याची माहिती मिळताच, गटविकास अधिकारी यांनी संबंधित विस्तार अधिकारी टी. डी. बिसेन, ए. ए. सेवेकर आणि के. पी. कोरे (समूह समन्वयक, स्वच्छ भारत मिशन) यांना चौकशीसाठी कलपाथरी येथे पाठवले. मात्र, चौकशीसाठी आलेल्या या अधिकार्‍यांना ग्रामस्थांनी रोखून धरत जोपर्यंत ग्रामपंचायतीकडून लेखी हमी मिळत नाही, तोपर्यंत चौकशी करू देणार नाही आणि कपाटाचे सीलही काढू देणार नाही, अशी आक्रमक भूमिका घेतली. त्यामुळे गावात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. यावर गटविकास अधिकारी यांनी गुरुवारी १० सप्टेंबर रोजी शासकीय कामात अडथळा आणणे आणि ग्रामपंचायतीच्या मालमत्तेला बेकायदेशीरपणे सील ठोकल्याप्रकरणी संबंधितांविरुद्ध तात्काळ एफआयआर नोंदवण्यात यावी, असे पत्र दिले आहे. तसेच ग्रामसेवक समितीच्या सदस्यांनीही एकजूट दाखवत पोलिस तक्रार नोंदवण्याची प्रक्रिया सुरू केली असल्याची माहिती आहे. तेव्हा आता कोणती कारवाई होणार याकडे गावकर्‍यांचे लक्ष लागले आहे.
 
 
आपत्कालीन कामांवर परिणाम
ग्रामपंचायत प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, सील केलेल्या कपाटात ब्लीचिंग पावडर खरेदी, महत्त्वाची प्रशासकीय कागदपत्रे आणि डास प्रतिबंधक उपाययोजनांच्या फाईल्स आहेत. कपाट बंद असल्याने पावसाळ्यात गावात करावयाच्या आपत्कालीन आरोग्यदायी उपाययोजना व वरिष्ठ कार्यालयाला अहवाल पाठवण्यात मोठा अडथळा निर्माण झाला आहे.
 
 
३१ ऑगस्ट रोजी रात्री उशिरापर्यंत ग्रामसभा घेण्यात आली आली. यावेळी आपण स्वतः ग्रामसभेला उपस्थित होतो. मात्र, पाच वर्षाचा जमा-खर्चाच्या हिशेबाचा लेखा-जोखा हवा या मागणीवरून गावकर्‍यांनी कपाटाला सील लावले, दरम्यान, चौकशी करीता गेलो असता चौकशी करू दिली नाही. यावर संबंधितांवर कारवाई व्हावी यासाठी गटविकास अधिकारी यांनी पोलिसात तक्रार दाखल करण्याच्या सुचना दिल्या आहे.
 
- टी.डी. बिसेन, विस्तार अधिकारी, पं.स. गोरेगाव