टॅरिफच्या धमक्यांना भारताचा ब्रिक्समधून पलटवार!

    दिनांक :11-Sep-2026
Total Views |
नवी दिल्ली,
India hits back at tariff threats अमेरिकेकडून टॅरिफ वाढीच्या धमक्या आणि पश्चिम आशियातील अस्थिर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत झालेल्या ब्रिक्स व्यवसाय मंचाच्या बैठकीत भारताने सदस्य आणि भागीदार देशांमधील व्यापार अधिक मजबूत करण्यावर भर दिला. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योगमंत्री पीयूष गोयल यांनी ब्रिक्स देशांनी एकमेकांसाठी बाजारपेठा अधिक खुल्या कराव्यात तसेच व्यापाराशी संबंधित नियम आणि प्रक्रिया सुलभ कराव्यात, असे आवाहन केले. परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनीही बदलत्या जागतिक परिस्थितीत ब्रिक्स देशांमधील सहकार्य अधिक व्यापक करण्याची गरज व्यक्त केली. ब्रिक्स व्यवसाय मंचाला संबोधित करताना पीयूष गोयल यांनी आर्थिक आणि राजकीय मुत्सद्देगिरीमध्ये अधिक चांगला समन्वय आवश्यक असल्याचे सांगितले. ब्रिक्स देशांच्या अर्थव्यवस्थांमध्ये व्यापाराचे महत्त्व मोठे असून, या समूहातील देश जगाच्या जवळपास निम्म्या लोकसंख्येचे प्रतिनिधित्व करतात. जागतिक सकल देशांतर्गत उत्पादनात त्यांचा वाटा सुमारे ४० टक्के असून, जगाच्या एकूण व्यापारातील ब्रिक्सचा हिस्सा जवळपास एक चतुर्थांश आहे. भारताची या व्यापार व्यवस्थेत महत्त्वाची भूमिका असल्याचे गोयल यांनी स्पष्ट केले. भारताच्या उत्पादन निर्यातीत अभियांत्रिकी वस्तू आणि इलेक्ट्रॉनिक्सचा मोठा वाटा असून, औषधनिर्मिती क्षेत्रातही भारत ब्रिक्स देशांसाठी विश्वासार्ह पुरवठादार ठरू शकतो.
 
 

4657 
 
व्यापार वाढवण्यासाठी केवळ शुल्क कमी करणे पुरेसे नसून, विविध देशांमधील नियम, मानके आणि व्यापार प्रक्रिया अधिक सोप्या करणे गरजेचे असल्याचे गोयल यांनी सांगितले. मालवाहतुकीतील खेप मंजूर होण्यासाठी लागणारा वेळ कमी करण्यावरही त्यांनी भर दिला. बिगर-शुल्क उपायांमुळे निर्माण होणारा अतिरिक्त व्यापार खर्च हीदेखील मोठी अडचण असल्याचे त्यांनी नमूद केले. ब्रिक्स देशांमधील पुरवठा साखळी अधिक मजबूत आणि विविधांगी करण्यासाठी दोन्ही दिशेने व्यापार वाढवणे आवश्यक आहे. कच्चा माल, महत्त्वाची खनिजे आणि इतर उत्पादनांसाठी बाजारपेठांमध्ये सहज प्रवेश मिळणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.ब्रिक्स व्यवसाय मंचाच्या उद्घाटनावेळी एस. जयशंकर यांनी यंदा ब्रिक्सच्या संस्थात्मक सहकार्याला २० वर्षे पूर्ण होत असल्याने हा समूहासाठी महत्त्वाचा टप्पा असल्याचे सांगितले. दोन दशकांच्या काळात ब्रिक्सची सदस्यसंख्या, कार्यसूची आणि सहकार्याच्या पद्धतींमध्ये मोठे बदल झाले आहेत. भारताच्या अध्यक्षतेखाली लवचिकता, नवोन्मेष, सहकार्य आणि स्थैर्याला विशेष महत्त्व दिले जात असल्याचे त्यांनी सांगितले. भू-राजकीय तणाव, महामारी आणि हवामानाशी संबंधित आव्हानांचा जागतिक अर्थव्यवस्थेवर थेट परिणाम होत असल्याने बदलत्या परिस्थितीनुसार देशांनी स्वतःला तयार ठेवणे आणि योग्य वेळी प्रतिसाद देणे आवश्यक असल्याचे जयशंकर यांनी स्पष्ट केले. जागतिक आव्हानांसोबतच नव्या संधीही निर्माण होत असल्याचे जयशंकर यांनी नमूद केले. वेगाने होत असलेले डिजिटलायझेशन आणि तंत्रज्ञानातील बदल यामुळे विकास, उत्पादकता आणि आर्थिक प्रगतीसाठी नवे मार्ग खुले होत आहेत. सध्याच्या जागतिक आर्थिक वातावरणात जोखीम आणि संधी दोन्हींचे स्वरूप व्यापक झाले आहे. त्यामुळे ब्रिक्स देशांनी परस्पर सहकार्य वाढवून व्यापार आणि आर्थिक संबंधांना अधिक बळ देण्याची गरज असल्याचा संदेश या बैठकीतून देण्यात आला.