नवी दिल्ली,
Iran praises India १८ व्या ब्रिक्स शिखर परिषदेसाठी इराणचे राष्ट्राध्यक्ष मसूद पेझेश्कियन शुक्रवारी तेहरानहून भारताकडे रवाना झाले. भारतात होणाऱ्या या परिषदेकडे पाहताना त्यांनी ब्रिक्सच्या वाढत्या सामर्थ्यावर भाष्य केले. एकतर्फी धोरणांना विरोध करण्यासोबतच आर्थिक, व्यापारी, औद्योगिक आणि वैज्ञानिक क्षेत्रातील सहकार्य अधिक मजबूत करण्याची क्षमता या गटात असल्याचे त्यांनी सांगितले. ब्रिक्समध्ये जगाच्या लोकसंख्येच्या ४५ टक्क्यांहून अधिक लोकसंख्या असून, जगाच्या एकूण भूभागापैकी सुमारे ३५ टक्के भूभाग या देशांकडे आहे, असेही त्यांनी नमूद केले.
पेझेश्कियन यांच्या मते, एकतर्फीपणाला आळा घालणे हे ब्रिक्सच्या स्थापनेमागील प्रमुख उद्दिष्टांपैकी एक आहे. सदस्य देशांनी आपले स्वातंत्र्य कायम ठेवत आर्थिक आणि व्यापारी संबंधांचा विस्तार करावा, यासाठी या व्यासपीठाचा उपयोग होऊ शकतो. यंदाच्या शिखर परिषदेचे घोषवाक्यही एकता, स्थिरता, लवचिकता आणि नावीन्य यावर आधारित आहे. आर्थिक व्यवहारांमध्ये डॉलरवरील अवलंबित्व कमी करण्याच्या गरजेवरही त्यांनी भर दिला. ब्रिक्स बँकेच्या माध्यमातून सदस्य देशांमध्ये संयुक्त गुंतवणूक आणि विविध उपक्रमांना चालना मिळू शकते, असे त्यांनी सांगितले. डॉलरवर अवलंबून न राहता देशांना आर्थिक आणि प्रादेशिक पातळीवर प्रगती करता यावी तसेच प्रमुख शक्तींच्या एकतर्फी निर्णयांना आणि अवाजवी मागण्यांना विरोध करता यावा, हा या प्रयत्नामागील उद्देश असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
भारत, चीन, रशिया, ब्राझील आणि इतर प्रादेशिक देशांच्या सहभागामुळे या परिषदेत द्विपक्षीय तसेच बहुपक्षीय सहकार्य वाढवण्यासाठी मोठी संधी निर्माण झाल्याचे पेझेश्कियन यांनी सांगितले. भारत आणि इराणचे संबंध दीर्घकाळापासून मैत्रीपूर्ण असून, दोन्ही देशांचा सामायिक सांस्कृतिक वारसाही महत्त्वाचा आहे. सांस्कृतिक, आर्थिक आणि सामाजिक क्षेत्रांमध्ये या संबंधांना आणखी विस्तार देण्याची मोठी क्षमता असल्याचे त्यांनी नमूद केले. ब्रिक्स एकतर्फी धोरणांविरोधात कितपत प्रभावी ठरू शकते, या प्रश्नावर त्यांनी हा गटच मुळात याच उद्देशाने तयार झाल्याचे सांगितले. जागतिक अर्थव्यवस्था अत्यंत गुंतागुंतीची बनली असून, गेल्या काही वर्षांत काही शक्तींनी आंतरराष्ट्रीय संबंधांवर निर्माण केलेल्या वर्चस्वाला सामोरे जाण्यासाठी नव्या दृष्टिकोनाची गरज असल्याचेही इराणच्या राष्ट्राध्यक्षांनी म्हटले. ब्रिक्स सदस्य देशांमध्ये नावीन्य आणि सहकार्य वाढल्यास या गटाचे सामर्थ्य अधिक वाढू शकते आणि आंतरराष्ट्रीय व्यवस्थेतील एकतर्फी धोरणांचा प्रभाव कमी करण्यास मदत होऊ शकते, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.